*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट तेरा🎗🎗🎗*
*☄विषय : विसरू कशी मी☄*
*🍂शनिवार : १५/ ०२ /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विसरू कशी मी?*
सख्या,विसरू कशी मी?
तुजसवे घालवलेले क्षण
हिंदोळ्यावरती झुलताना
हरवून जायचे माझे मन
घरातल्या कणाकणात
आहे नित्य तुझा वास
जरी दूर तू गेला सोडून
तू असल्याचा होतो भास
पदोपदी सख्या तुझी रे
होते मनाला आठवण
तुझ्या अनेक सुखस्मृतींची
केली आहे अंतरी साठवण
तुझ्या विरहात सख्या
जेव्हा उदास वाटते मनाला
धीर देतात मज आठवणी
स्थैर्य लाभते जीवाला
जन्मोजन्मीची साथ देईल
दिले होते तू वचन मजला
विसरू कशी तुला रे मी
तुझ्या अभावी श्रुंगार रूसला
घेऊन साथ तुझ्या स्मृतींची
मार्ग चोखाळते जीवनाचा
देतात त्या शक्ती मला नी
घेते श्वास मी विश्वासाचा
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरु कशी मी?*
क्षणभराचा असेल राग तुझा
मणभर प्रेम विसरू कशी मी?
सर्वस्व तुजला समर्पण आहे
तुझीच सजना अर्धांगिनी मी…
दिलेस जीवदान मज तूम्ही
सोडविलेत मृत्यच्या दाढेतून,
पुनर्जन्म झाला आहे माझा
जीवदान मिळे यम मुखातून…
त्या क्षणाला विसरू कसे मी
मी मरण यातना भोगत होते,
असेल नसेल जवळी कोणी
माझे पतिराज सोबती होते…
शोभा आहे तुमच्यामुळे ही
घरांगण दिसतेय की शोभून,
भाळी माझ्या हे सौभाग्याचं
लेनं कुंकू दिसतंय हो उठून…
राग असेल जरी क्षणभराचा
तो थोडाच राहील कायमचा,
संबंध आपलाचं नातेबंधाचा
मनी जपलाय साताजन्मीचा…
विसरु कशी मी प्रेमाचे बंधन
जीवनभर साथ द्यायचे वचन,
खचून जाऊ देऊ नकाचं मन
प्रतिज्ञा तंतोतंत करेल पालन…
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी*
तुझ्या गुलाबी हास्याने
भाळली होती तुझ्यावरी
काय होत तुझ्यात कळेना
बेधुंद व्हायची वेड्यापरी
डोळ्यासमोर तू येताच
मनी माझ्या बहरली प्रीत
विसरू कशी मी साजना
प्रत्येक क्षण आठवणीत
हृदयमंदिरी तुझीच मुरत
स्वप्नातही तुझा सहवास
तू चंद्रमा तूच माझा रवी
सभोवती तुझेच आभास
विसरू कशी मी तुज प्रेम
त्यात असायचा आपलेपणा
तुला असायची माझी ओढ
तुझ्या मनी नसायचा दुजेपणा
किती गोड होत आपलं हे
न तुटणारं दोघातल नातं
हुरहुर आजही मला तुझी
सुखच दिले तू जीवनात
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*विसरू कशी मी?*
तुझ्यात दिसले सुंदर
ते एक जाणिवांचे गाव
मैत्रीचे ते जुळले नाते
हृदयी वसले प्रीतभाव
फुलून यावे अक्षर अक्षर
असा तू मुक्त व्यासपीठ
आडपडदा सारूनी दूर
शब्दही झाले जरा धीट
अलगद पुसता झालास
मम पापणकाठची ओल
शब्द तुझे प्रेमळ धीराचे
रूजले उरात खोल खोल
रंग भरूनीया चैतन्याचे
इंद्रधनू परी झालास लुप्त
परतीची तुझ्या वाट नि
आशाही झाली धुसर सुप्त
नव्हतेच कदापि मजसाठी
तुझी दिशा नि तुझे वळण
परी का घडली नकळतशी
प्रेमाची गोड जडणघडण
आता विसरू कशी मी?
तो शब्द सहवास मधूर?
प्रारब्धात जरी तू नाही
मम हृदयाचा तूच चोर..
मम हृदयाचा तूच चोर..
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी?*
नजरेची भाषा
गोड गुलाबी संवाद
मी गुतंते त्यात
परि मन घाली वाद
नजरेला नजर मिळे
घायाळ मन माझे
परि नजर तुझी सख्या
सांगे काहितरी आगळे
नजरेच्या या खेळात
कासावीस जीव माझा
नजर वळता तुझी सख्या
नकार जाणवे तुझा
नजरेची भाषा माझी
सांग तुला कळेल का
होकार दडलाय त्यात
तो तुला उमजेल का
प्रतिक्षेत सख्या तुझ्या
ओठांची मोहोर दडपलेली
विसरू कशी मी ?
नजरेची भाषा गंधाळलेली
*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी?*
विसरू कशी मी?
डोळ्यांची ती भाषा
अथांग सागरातील
लाटा उसळणार्या जशा
मनाचा आग्रह,जा अन् भेट त्याला
नको वेळ दवडू
भागव आरक्तलेली त्रीषा
व्याकूळलेलं मन
तूला का दिसत नाही
पछाडलेली मी कशी एकटी राही
पण आता कळते
मीही भांबावले होते
घ्यायचास कीती सदा
माझ्यामागे झोके
विसरू कशी मी
तू दिलेले आकाश
रीती माझी झोळी
ज्यात भरला प्रकाश
गारुड घालणारा तु असा गारूडी
कृष्णच जणू मी पाहीला ह्या डोळी
कीत्ती गोष्टी आठवतात
कशी मी विसरू
कशी एकएका अवयवास समजावू
तन-मन गहाण
भरू कोणत्या राशी
श्वास तू माझा
तूला विसरू कशी?
*सौ.भावना अजय इटकीकर हिंगणघाट जि.वर्धा*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी*
विसरू कशी मी आई
अखंड मायेचा झरा
त्यागाची प्रतिमा आई
शीतल प्रेमाचा वारा ॥१॥
किती वर्णावा महिमा
मृदु मवाळ गोडवा
ती ईश्वरी परमात्मा
देह तिने झिजवावा ॥२॥
नित्य प्रेमाची सावली
चंदनाची देई छाया
ममतेची ती माऊली
झिजवी आपली काया ॥३॥
जीवनाला देई अर्थ
मुलांची असते गुरू
नसतो तियेचा स्वार्थ
जीवनाचा ती आधारू ॥४॥
संकटात उरी धरे
पोटाशी तिचे लेकरू
विसरू कशी मी बरे
मनाला कसे आवरू ॥५॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी*
विसरू कशी मी सखया
ती भेट आपली गंधाळलेली
वाट तुझी पाहून थकलेली
मी विसावले कदंबतळी
अवचित एक स्वप्न जागले
त्या स्पर्शात मी मिटले
काय घडले काही कळेना
रंगात तुझिया मी रंगले
भूमीवरी पाऊल पडेना
मना लागले रे पिसे
भाववेड्या माझ्या मनाला
आता आवरु मी कसे
मम गात्रांत चैतन्य चेतले
क्षण क्षण उत्सव झाला
तोची तुझा गंध कस्तुरीचा
अंगभरी रे मी लपेटला
फुलाफुलांत फुलूनिया
मीच आता फूल जाहले
तुझ्या अस्तित्वाच्या खुणा
जळीस्थळी शोधू लागले
निळे आभाळ पांघरूनी
ओढाळ स्पर्श शोधते
लाजताना मी आता
नभी चांदणी ही लाजते
निळ्या सावळ्याचे गारुड
माझ्या अंगभरी पसरले
मीच सावळ्याच्या आता
शिरी मोरपीस शोभले
मना लागे निळी चाहूल
अंगांग माझे हे मोहरले
अंतर्यामी तो झिरपत गेला
मीच अरे कान्हा जाहले
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी ?*
विसरू कशी मी? त्या आठवणींची
पाने फुलांनी सजली जिथे.
तू गुंफलेला स्वप्नांचा गजरा,
आजही दरवळतो मनात इथे…
विसरू कशी मी? त्या सावल्यांना,
जे चांदरातींचे साथी होते
तुझ्या स्पर्शाचा श्वास अजुनी,
धुक्यासारखा सांडत होते…
विसरू कशी मी? त्या वचनांना,
जे ओठांवरती थरथरत गेले.
तुझ्या डोळ्यांतील अनाम प्रेम,
सागरासारखे सळसळत गेले…
विसरू कशी मी? त्या वाटांना,
जिथे तुझ्या पाऊलखुणा उमटल्या
तिथेच अजुनी उभी राहुनी,
मी काळजाच्या हाका ऐकल्या…
विसरू कशी मी? सांग ना सांग,
जेव्हा नभ तुझ्या आठवांनी भरते.
ओंजळ भरुनी साठवते वेदना,
आणि पापण्यांवर शांत सागर उतरते..
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी*
कळलेच नाही कधी
तू माझे चित्त चोरले
मी तुझे नाव माझ्या
चक्क ह्रदयी कोरले.. //
या उरातली धडधड
ओठामधील थरथर
कळून चुकले सारे
जरी असे मी नवथर..//
रात्री अपरात्री मला
अवचित येतेय जाग
येतोस कसा स्वप्नात
हळूच काढीत माग.. //
गाली खुदकन हसते
कावरी बावरी होते
एक गोड शिरशिरी
शरीरी उमटून जाते.. //
माझी मी ना उरलेय
तू केली अशी जादू
ओढ म्हणू की वेड
मन होतेय रे बेकाबू.. //
तूच दिसतो दर्पणी
लाजेने होते चूर चूर
सांग रे मन मोहना
ही कशाची हूर हूर.. //
का होई जीव खुळा
सुटले गुलाबी कोडे
तू सागर मी सरिता
अंतर राहिलेय थोडे… //
अर्ध्य दान घे प्रितीचे
उरले नाही माझी मी
हीच होती तपस्या
सांग विसरू कशी मी..?
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरु कशी मी*
विसरु कशी मी
अनमोल क्षणाला
संकटात असताना
धावलास मदतीला
वासनांध गिधाडे
घालत होती पिंगा
घेरुन मज गोलात
उडवत होती दंगा
हाक मारली अशी
जीवाच्या आकांताने
सय झाली शिवबाची
जीव वाचवला जीवाने
आला धाऊन तो असा
अब्रु मज शाबूत राहिली
विसरु कशी मी सांगा
माझ्या आयुष्याची काहिली
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरू कशी मी*
विसरू कशी मी तुला
तूच माझी जन्मदाती
वागविले मजला गर्भात
उपकार मानू तरी किती
वंशाचा हवा होता दिवा
मात्र आई तू ठाम होती
जन्मास घातले कळीला
धन्य झाली ही पणती
माझ्या जन्मानंतरही तुला
सुरूच होता शब्दांचा मारा
सर्वकाही सहन करत आई
जीवनी फुलविलास पिसारा
घरातले प्रत्येकजण माझा
करत होते गं तिरस्कार
मात्र तुझ्या प्रेमळ मायेने
घडले माझ्यावर संस्कार
कुशीत घेऊनी मजला
शिकविली गं भातुकली
कितीही मोठे झाले जरी मी
तुझ्यासाठी मी तिचं छकुली
*कुशल गो डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
*विसरु कशी मी?*
तुझ्या हृदयाच्या जळात
कितीवार नाहली मी..
ओल्या स्पर्शात त्या ..
प्रीतवेल बहरलेली…
तुझ्या मुग्धतेत..
हर वेदना निमाली
विसरू कशी मी?
ते क्षण सौख्याचे
जरी या वळणावर
हात सुटले तुझे…
*तारका रुखमोडे*
*अर्जुनी/मोर.जि. गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💜🌹💜♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



