Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरदेश-विदेशनागपूरपुणेमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

धुक्यात हरवली प्रतापगडची वाट

वसुधा वैभव नाईक

0 4 8 2 8 6

धुक्यात हरवली प्रतापगडची वाट

दि. 22.06.2025, रविवार रोजी मी आणि माझे कुटुंबीय प्रतापगड पाहण्यासाठी निघालो. निसर्ग सौंदर्य अप्रतिम होते. वळणावळणाची वाट,ढग खाली आलेले. सर्व निसर्ग हिरवा गार देखणा झालेला. जणू काही या धरणी मातेने हिरवा शालू पांघरला आहे असेच वाटत होते. “हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग कसा, दिसतो कसा खंडाळ्याचो घाट… ” हे गाणे ओठावर येत होते.

घाटातली वाट काय तिचा थाट
मुरकते गिरकते लवते पाठोपाठ
निळी, निळी परडी कोणी केली पालथी
पान फुलं सांडली वरती आणि खालती
घाटातली वाट काय तिचा थाट
मुरकते गिरकते लवते पाठोपाठ….!

ही पूर्वीची कविता मनात घोळायला लागली. देखण्या निसर्गाचे सौंदर्य पाहता पाहता मन आनंदी, उत्साही होत होते. ढग खाली आल्याने धुके खूप साठले होते. दरीखोऱ्यातले सौंदर्य लपून गेले होते. समोरचा रस्ता दिसत नव्हता. इतके दाट धुके पसरले होते. उजेड होता त्यामुळे विशेष काही वाटले नाही. माझा ड्रायव्हर रवी गाड्यांचा अंदाज घेत रस्त्याचा अंदाज घेत गाडी उत्तम चालवत होता. रस्त्याला जाताना दुतर्फा हिरवीगार झाडी होती. काही ठिकाणी तर ही झाडं वरच्या दिशेने एक झाली होती. त्याची सुंदर कमान दिसत होती. अशा ह्या निसर्ग सौंदर्यातून आम्ही प्रतापगडावर पोहोचलो.

तिथे पाऊस चालूच होता. रिमझिम बरसणारे पावसाचे थेंब अंगावर झेलत आम्ही पुढे गेलो. मस्त हवेत गारवा पावसाचे थेंब आणि प्रतापगड. अवर्णनीय सारे शब्दात वर्णनच नाही करता येणार. सृष्टीचा हा चमत्कार खूप देखणा होता. प्रतापगडावर देखील इतकं धुकं होतं की ढग असे आमच्यासमोर चालतात फिरतात असं जाणवत होतं. प्रतापगडाची डागडुजी चालू असल्याप्रमाणे तिथे माती आणि दगड होते. सर्व तरुण वर्ग गडावर होता. मी माझ्या नातवंडांना प्रतापगडाचे महत्व समजून सांगत होते. तिथल्या खाणा- खुणा, दरवाजे यांची माहिती थोडक्यात देत होते. गनिमी कावा समजावून सांगितला. पाऊस खूप सुरू झाला आता आम्ही गड उतरायला लागलो. गड उतरला. खाली आलो आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.

परतीच्या या प्रवासात आम्ही ‘जीव मुठीत घेणे ‘या वाक्प्रचाराचा अर्थ अनुभवात होतो. प्रतापगड उतरताना ढग खाली आलेले होतेच खूप धुकं होतं समोरची गाडी सुद्धा दिसत नव्हती. त्यात रेडियम रिफ्लेक्टर पोल जे होते ते काही ठिकाणी होते काही ठिकाणी नव्हते. पावसाच्या ह्या धुक्यामुळे गाडीचा प्रकाश रेडियम रिफ्लेक्टर पोल वर पडले असता तो चमकायचा आणि त्यामुळे रस्त्याचा अंदाज येत होता. परंतु काही ठिकाणी हे नसल्याने अगदी पाच ते दहा च्या स्पीडने आमची गाडी पुढे जात होती. यावेळी अक्षरशः जीव मुठीत घेऊन आम्ही सर्व गड उतरत होतो. गड उतरून आलो. आता पसरणे घाटातही सेम अवस्था होती. आमच्या रवी ड्रायव्हरला गाडी कशी चालवली हे त्यालाच माहिती.

साईबाबांचा नामस्मरण जप सतत चालू होता. एकदाचा पसरणीचा घाट सुद्धा आम्ही ओलांडला. आणि बिन धुक्याची वाट दिसायला लागली. मनावरचा ताण कमी झाला. हुशश आलो एकदाचे खाली!असे झाले. धुक्यात हरवलेल्या प्रतापगडाच्या वाटेने येताना मात्र आम्हाला खूप टेन्शन दिले. कोणताही एक्सीडेंट न होता सुखरूप घरी पोहोचलो तेव्हा साईबाबा चरणी नतमस्तक झाले. खरं तसे पाहता या दिवसांमध्ये गड किल्ले चढणं जरा कठीण होतं. पण तरीसुद्धा जरा वेळ होता पावसाचे चिन्ह कमी होतं म्हणून जरा मुला- बाळाला घेऊन गड पाहायला गेलो होतो.

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे