“पारंपारिक भोंडला सण, मनोरंजन आणि संस्कृती दर्शन”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय 'हायकू काव्य' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“पारंपारिक भोंडला सण, मनोरंजन आणि संस्कृती दर्शन”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
भारतीय संस्कृतीत सणवार, व्रत, वैकल्यांना विशेष स्थान आहे. अतिप्राचीन ऋषिमुनींनी ऋतुचक्रानुसार मांडणी केलेल्या अनेक सणोत्सवामागे एक विशिष्ट उद्देश ठेवलेला आहे. ज्यामध्ये मानवी आरोग्य, परस्पर सौहार्द, निसर्ग संवर्धन, शेती, भूतदया, राष्ट्रप्रेम या सर्वांप्रती महत्त्वपूर्ण संदेश असतो. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते स्व.पांडूरंगशास्त्री आठवले म्हणतात की,”भक्ती एक सामाजिक शक्ती आहे” ज्यातून मानवी जीवनात, सामाजिक क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. लोकमान्य टिळकांनी याच उद्देशाने स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करून, त्या माध्यमातून देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली. ग्रामीण भारतातील अशिक्षित समाजमनात भक्तीमार्गाने विज्ञान रूजवण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सण उत्सव असतोच.
सण केवळ मनोरंजन नसून प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. ज्यातून तुटलेली नाती गोती सांधता येतात. सामाजिक एकोपा नांदतो, पशू, पक्षी, निसर्ग प्रेम दृढ होते, शेती, माती, पाणी यांचे महत्त्व लक्षात येते. म्हणून तर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या सर्वाची भक्तीशी सांगड घातली गेली आहे. जुन्या काळात अगदीच अल्पवयात मुलींचे विवाह होत असत. त्यामुळे खेळणे बागडणे दुरापास्त होत असे. याची उणीव भरून काढण्यासाठीच नागपंचमी, मंगळागौर, भोंडला किंवा भुलाबाई असे सण अस्तित्वात आले. ज्यातून सासरहून माहेरी आलेल्या लेकी आपले सुखदुःख याच खेळातून मांडून मन मोकळे करतात. ज्यामध्ये प्रत्येक मानवी नात्याचे महत्त्व उजागर होते. ती नाती जपण्याचा संदेश मिळतो. ही योजना फक्त भारतीय संस्कृतीतच पहायला मिळते.
आता वळूया आपल्या शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेकडे. आ. राहुल दादांनी दिलेले चित्र, “भोंडला” “हादगा” “भुलाबाई” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील एका अतिशय लोकप्रिय उत्सवाचे आहे. ज्यामध्ये मुली किंवा महिला गोल रिंगण करतात. आणि मधोमध हत्तीचे चित्र असते. साधारणपणे अश्विन महिन्यात येणारे हस्त नक्षत्र हे परतीच्या पावसाचे खूप महत्वाचे नक्षत्र मानले जाते. ज्याचे वाहन हत्ती असते. हे नक्षत्र समाधानकारक बरसले तर कृषि उत्पन्न कमालीचे वृद्धिंगत होते अशी धारणा आहे. तसेच हत्ती हे समृद्धीचे प्रतिक आहे. अल्पवयीन मुली परकर पोलके, आणि महिला साड्या वगैरे पोशाख परिधान करून या चित्राभोवती गोलाकार नृत्य करत गाणी म्हणतात. तसेच खेळानंतर एखाद्या डब्यात लपवून ठेवलेली खिरापत आणली जाते. आणि ती उपस्थित मुली, स्त्रियांना अंदाजाने ओळखावे लागते. त्यानंतर प्रसाद म्हणून खाल्ले जाते. या खेळासंदर्भात अनेक पौराणिक कथांचा संदर्भ आहे. रूसलेल्या पार्वतीचे मन वळवण्यासाठी शंकरांनी “भुलोबा” बनून तिच्या माहेरी गेले असल्याचे वर्णन आहे.
या चित्रावर हायकू लेखन करायचे आहे. ज्यातून प्रामुख्याने पारंपरिक कला,संस्कृती ,संस्कार, त्याचे महत्व, मानवी जीवन, निसर्ग इत्यादीशी असलेला संबंध अधोरेखित होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने अनेकांनी छान प्रयत्न केला आहे. तरीही चित्र विषयाचा सूक्ष्म अभ्यास. निरिक्षण याचे प्रतिबिंब रचनेत दिसायला हवे. याची काळजी हायकूकारांनी ठेवायला हवी.. सर्वाच्या लेखणीला शुभेच्छा.. आणि मला परीक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनःपूर्वक आभार..!
विष्णू संकपाळ, छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक/लेखक/ कवी
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



