Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनचंद्रपूरनागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

तावून सुलाखून निघालेलं रत्न…सौ. सुनिता अनिल पोहाणे ( इटनकर ) !

वैशाली उत्तम अंड्रस्कर,( वांढरे )

0 4 8 2 9 0

तावून सुलाखून निघालेलं रत्न…सौ. सुनिता अनिल पोहाणे ( इटनकर ) !

खरंतर बऱ्याच दिवसांपासून लेखणी वाट बघत होती. वैशाली आज लिहेल उद्या लिहेल करता करता जानेवारी उलटून फेब्रुवारी महिना उगवला पण नन्ना…आमची कारणे तर ठाऊकच बहुतेक सर्वांना…वेळेची मर्यादा…घरसंसार, नोकरीचा व्याप… वगैरे वगैरे…या कारणांना अंत नाही.

तर सांगायची गोष्ट अशी की, १२ जानेवारी २०२५ राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या थोर व्यक्तिमत्वाचा जयंतीचा दिवस. याच शुभ पर्वणीवर मला एका अत्युत्तम सोहळ्याचे साक्षीदार होता आले ते म्हणजे माझी बालमैत्रिण कु. सुनिता काशीनाथजी इटनकर अर्थात सौ. सुनिता अनिल पोहाणे हिच्या यजमानांचा सेवानिवृत्तीपर सोहळा. ३० डिसेंबर हा अनिल भाऊजींचा वाढदिवस मात्र कामाची व्यस्तता यामुळे १२ जानेवारीला सुनिताच्या घराजवळीलच दुर्गादेवी मंदिरात हा कार्यक्रम संध्यासमयी ठेवण्यात आलेला आणि मला या सोहळ्याचे आवर्जून निमंत्रण आलेले.

घरची कामे आवरून धावतपळतच कार्यक्रमाला गेलेले. कार्यक्रम नुकताच सुरू झालेला. मंचावर श्री. अनिल भाऊजी आणि सुनिता सुरेखसा पोशाख करून बसलेले. निवेदिका आपल्या प्रभावी शब्दांत सूत्रसंचालन करताना. नातेवाईक, मित्रमंडळी भावूक होऊन भाऊजींच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करत होते…चिरंजीव अपूर्व आणि संकल्प दोघांनीही आपल्या पप्पासोबतच्या आठवणींना उजाळा देत सुख-दुःखाचे क्षण आलेल्या पाहुण्यांसोबत वाटून घेत होते. त्याचबरोबर सरपंचांच्या मुलीने अर्थात सुनिताने पत्र्याच्या घरात आरंभलेला संसार कसा चिकाटीने, जिद्दीने फुलवत नेला याची हळवी बाजू विषद करताना मुलांनी म्हटले, काजू किसमिस खाणाऱ्या घरातील आमची आई पप्पांसोबत राहताना किती अवघड गोष्टींचा सामना करत गेली याला तोड नाही. तर पप्पा म्हणजे जणू कलिंगड वरून टणक मात्र आतून गोड, रसाळ…अशा भावविभोर मनोगतांनतर प्रत्यक्ष सुनिता माईक समोर आली आणि आयुष्याचे एकेक पदर अलगद उलगडू लागली.

प्रिय सुनिता, इयत्ता पहिली दुसरी पासूनच तू एक वेगळं रसायन होतीस. अभ्यासात हुशार त्याचबरोबर सरपंच असलेले वडील काशीनाथजी इटनकर यांच्यातील नेतृत्व गुण तुझ्याही अंगी मुरलेले. त्यामुळे १५ ऑगस्ट, २६ जानेवारीचे भाषण असो वा ‘अबोल झालीस का ?’, मधील बालकलाकार असो…तुझा आत्मविश्वास कायम दुणावत राहिलेला. नंतर परत अकरावीतील आपली सोबत त्यानंतर डी. एड. करीता आपले दुरावणे. नोकरी, लग्न, घरसंसार यातच आपले हरवणे. परत एकदा एका नव्या वळणावर आपली भेट. पण या सर्व मध्यंतरात घडलेले ऐकण्याची संधी तुझ्या मनोगतातून ऐकायला मिळाली. तू म्हणाली, लग्नावेळी तू चक्क बाबांजीसोबत भांडली आणि तुझ्या दृष्टिकोनातून काय कुणाच्याही दृष्टिकोनातून ते योग्यच वाटले असते. पण बाबांजीनी दिलेला कायम सोबत असण्याचा शब्द आणि तुझे धैर्य, तुझी सहनशीलता या सर्वांनी तुला तावूनसुलाखून निघून लखलखत्या हिऱ्यालाही लाजवेल अशी प्रकाशमान झालीस.

खरंच तुझा शब्द न् शब्द कानात साठवताना तुझ्याबद्दल मनात अभिमान दाटून येत होता. शिक्षणाच्या पायरीवर उभी असताना अर्धवट शिक्षण ठेवून तू सप्तपदी चाललीस. मात्र तुझ्या आकांक्षांना अनिल भाऊजींनी पंख पसरून झेप घेण्याची संधी दिली. बी. ए. एम. ए. बी. एड. यांसारख्या उच्च शिक्षणाची क्षेत्रे तू सहज पादाक्रांत केलीस आणि आज जिल्हा परिषद केंद्र शाळा, यशवंतनगर जिल्हा चंद्रपूर येथे मुख्याध्यापिका म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेस. तेही भाऊजींनी तुझ्यासमोर ठेवलेल्या सर्व अटींना सांभाळून…. खूप मोठे कुटुंब, त्यांतील सर्वांची मने राखणे, सर्व समारंभांना कोणतीही सबब न सांगता हजर राहणे अशा एक ना अनेक आठवणींचा पसारा उलगडताना तुला भरून येत होते.

कंठ दाटत होता…पण तितक्याच धैर्याने तू व्यक्त होत होतीस…भाऊजींच्या स्वभावात कठोर ते मृदू होत गेलेला बदल आणि कर्तव्यव्याप, प्रकृती यांमुळे तुझ्या स्वभावात आलेला थोडासा चिडचिडेपणा भाऊजी आज कसे समजून घेतात आणि तुझी समजूत काढतात तेही अलवार सांगितलेस… ऐकताना वाटत होते….खरेच माझी बालमैत्रिण जिला मी आधीपासून ओळखत होते…ती मला त्या क्षणी सापडली… आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे टाकणारी… तुझ्या भावी आयुष्यातील प्रत्येक पावलांसाठी भरभरून शुभेच्छा गं मैत्रिणी….!

तुझीच बाल मैत्रिण
वैशाली उत्तम अंड्रस्कर,( वांढरे )
जि.चंद्रपूर
========

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे