
0
6
3
3
0
8
नाराजी नाट्य
नाराजीचे नाट्य रंगले,
शब्द ओठांवर थांबले,
डोळ्यांमधले भाव मात्र
सारे काही सांगून गेले.
रुसव्याच्या पडद्याआड
मन हळवेच दडले होते,
जिंकण्याच्या हट्टामध्ये
दोघेही आतून हरले होते
अबोल्याची भिंत उभी
दिवसेंदिवस उंचच गेली
मनातली ओढ मात्र ही
अधिकच गहिरी झाली
“तूच आधी बोल” म्हणता
क्षण सारेच निघून गेले,
अहंकाराच्या सावलीत
आपुलकीचे दिवे विझले.
शेवटी एक अश्रू ओघळला,
सारे नाट्यच संपून गेले,
नाराजी नव्हती मनात—
प्रेमाला शब्द कमी पडले!
वृंदा (चित्रा) करमरकर
जिल्हा सांगली
0
6
3
3
0
8



