0
4
8
2
8
4
कविता पूर्ण झाल्यावर
आनंदाचे उधाण येते
मनासारखे लिहिल्यावर
समाधानाची लहर पसरते
कविता पूर्ण झाल्यावर ||१||
कवितालेखन खरे तर
विषय माझ्या आवडीचा
प्रश्न मात्र नेहमीच असतो
उपलब्ध असणाऱ्या सवडीचा ||२||
विषय असतो मनात
लेखणीला खुले आव्हान
व्यक्त होऊ लागतो असा
वास्तवाचे ठेऊन भान ||३||
शब्दांकुर फुलतात काही
माझ्या मनाच्या कप्प्यात
आशयाची मांडणी जुळते
माझ्या नजरेच्या टप्प्यात ||४||
विषय,आशय,शब्दांचा
होतो परस्पर व्यवहार
भावार्थाने ओथंबून जातो
माझ्या कवितेचा आकार ||५||
कविता माझी नटूनथटून
अशी साजरी दिसते
रसिकांची दाद मिळाल्यावर
खुदकन गाली हसते ||६||
असा आनंद निराळाच
झोका जातो आभाळावर
सरस्वतीचे कृपादान लाभते
कविता पूर्ण झाल्यावर ||७||
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर जि.पुणे
==========
0
4
8
2
8
4



