आज सोनियाचा दिनु….!; तारका रूखमोडे
आज सोनियाचा दिनु….!; तारका रूखमोडे
आपल्या ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला’ असे मराठी भाषा सक्षमीकरण तथा संवर्धनाचे अनेक वर्षांपासून अविरतपणे काम करणारे मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल पाटील सर यांनी आपल्या प्रतिक्रीयेतून आनंद व्यक्त केला. नि हे ऐकताच माझाही आनंद गगनात मावेनासा झाला. आज सोनियाचा दिनु.. गगनावरि गेला माझ्या मराठीचा वेलु.. असं वाटून अभिमानानं माझी छातीही सह्याद्रीसम फुलली.
मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी मराठीचे शिलेदार संस्था कार्य करत आहे.या यज्ञात संस्थापक राहुल पाटील सर भाषा वाचवण्यासाठी आपल्या श्रमरुपी समिधा अर्पण करीत आहेत.त्यांच्या या कार्याचं फलित तथा भाषेसाठी झटणाऱ्या सर्व साहित्यिक बांधवांच्या कार्याचं फलित म्हणजे हा ऐतिहासिक निर्णय..भाषेसाठी कार्य करणाऱ्यांसाठी व तमाम मराठी साहित्यिकांसाठी ही अमृताची पर्वणीच आहे .
आमच्या शिलेदार समूहात महाराष्ट्राच्या तथा संपूर्ण देशातील विभिन्न कोपऱ्यातून मराठी बोलीचे झरे तिचा विशिष्ट साज लेवून प्रमाण मराठीच्या सरितेत मिसळून मराठीचे शिलेदार समूहप्रवाहातून अविरतपणे वाहत आहेत. लोकसंस्कृतीला व काव्य संस्कृतीला जगवत आहेत. शासनाच्या या निर्णयाने ही प्राचीन रसमय भाषा अमृताची ठेव आता जतन केली जाईल. अभिव्यक्तीला मर्यादा येणार नाही. प्रत्येकाच्या मनात दडलेला लेखक आता त्याच्या मायमराठीच्या अभिनिवेशात अभिव्यक्त होईल. शतकानुशतकानंतर या लढ्याला यश आलेले..मराठीसाठी कार्य करणाऱ्या तमाम साहित्य रसिकांसाठी खरंच हा सोनियाचा दिनु आहे. व मलाही या क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णयाचा अभिमान आहे. सर्व मराठी शिलेदारास व मराठी बांधवास अभिनंदनीय शुभेच्छा.



