अभिशाप फारकतीचा…जाळतो मनाला….!’; वैशाली अंड्रस्कर
‘अभिशाप फारकतीचा…जाळतो मनाला….!’; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
त्याने आभाळाशी फारकत घेतली नि धो धो बरसला… कौलारू छते, सिमेंट-कॉंक्रिटच्या गच्च्या स्वच्छ झाल्या…आबालवृद्धांनी धारा हातावर झेलल्या आणि मातीने अशा सर्व सरी आपल्या कुशीत सामावल्या…कुठलाच भेदभाव नाही….कुठून आली…? कशी आली…? याच्याशी तिला काहीच घेणेदेणे नव्हते. या मातीला आता एकच माहित होतं… आलेल्या सरींनी आपल्या कुशीत निजलेल्या बीजांना भिजविणे आणि लाल काळया मातीतून हिरवेकंच लेणे तरारून आणणे…त्या लेण्यांना धान्याचे मोती लगडणे…त्या मोत्यांनी धरेवरील साऱ्या जीवांची भूक भागवणे…पण मानवाला कधी जमणार अशी फारकत घेणे…? की नात्यांशी फारकत घेऊन अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेसारखी मने वागवीत भटकावीत अहर्निश….?
‘फारकत’ हा शब्द कानावर पडताच सर्वांत आधी लख्खकन डोक्यात येतं काडीमोड… घटस्फोट… त्यानंतर वेगवेगळ्या विचारांचे परस्परांतील वाद आणि आईवडील, बहिणभावंडं, शेजारीपाजारी, मित्रमैत्रिणी यांच्याशी घेतलेली फारकत. हरकत नाही…नाही पटत नका बोलू…नका संपर्क ठेवू….तांडव करून मांडव घालण्यात काहीही अर्थ नसतो. त्या मांडवात सावली ऐवजी मिळणार फक्त उकाडा…दुःखाचा, वेदनेचा….!
आज मराठीचे शिलेदार समूहात शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय मुख्य प्रशासक राहुल दादा पाटील यांनी ‘फारकत’, हा विषय दिला आणि मनात विचारांची खलबते सुरू झाली. फारकत प्रत्येकवेळी बिघडवणारीच असेल असेही नाही. पाऊस आणि आभाळ यांच्यासारखी नवजीवन देणारीही असू शकते.
मात्र आजच्या काळात एक घाव दोन तुकडे हाच प्रघात चालला आहे. भौतिक सुविधांची लालसा, व्यक्तिस्वातंत्र्याचे अवास्तव स्तोम, शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात वाढलेली स्पर्धा यांचा ताणतणाव यांमुळे मनाची शांती हरवून बसलेल्या समाजाला फारकतीचा शाप लागलेला आहे. जो मनाला जाळतो आहे. आईवडिलांच्या फारकतीत कित्येकांचे बालपण करपत आहे. अशावेळी फारकत घ्यायचीच असेल तर राग-द्वेषाशी घ्यावी, दुष्ट विचारांशी घ्यावी, शरीरास हानिकारक अशा पदार्थांची घ्यावी, समाजातील वाईट रूढी परंपरा यांच्याशी फारकत घ्यावी नाही का…? अशाच शिलेदारांच्या आशयसंपन्न रचनांनी मराठीचे शिलेदार समूह आज सजला…सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा…!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह



