0
4
8
2
9
0
हळवे असतात शब्द
जीवांसंगे शब्द जन्मतात
पहिल्या वहिल्या टाहोतून
जन्मच हा मग पोसला जातो
मन: शब्दाच्या नाळेतून
भावनांची कुस होता गरवार
विस्तारतो शब्दांचा परिवार
संवाद हा जगाशी अलवार
स्पर्श जणू मायेचा हळुवार
बालपणाच्या हिंदोळ्यावर, शब्द मीत झुलतात
तारुण्याच्या उंबरठ्यावर, शब्द सखे प्रीत होतात
आयुष्याच्या संध्याकाळी, समर्पणाचे गीत गातात
सरणाच्या वेदी वरती, सांत्वनाची रीत होतात
शब्दांच्या घावांवरती, शब्द होती प्रहार
मणामणाच्या ओझ्याखाली, वेदनांचा हुंकार
शब्द कधी नादमय, जणू विणेचा झंकार
कुठे, शब्दांनी होतो, त्रिवार जयजयकार
सुखाच्या क्षणी अंतरी मुग्ध
दुःखाच्या पारावरी स्तब्ध
ध्यान-मौनातून राहून निःशब्द
किती हळवे असतात शब्द
स्वाती लभाने
ता. जि.वर्धा
========
0
4
8
2
9
0



