1000 वा डहाळीअंक विशेष मुलांच्या शुभहस्ते प्रकाशित
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
1000 वा डहाळीअंक विशेष मुलांच्या शुभहस्ते प्रकाशित
डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी अंक
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
पुणे : 11 डिसेंबर 2025 पहिल्या विश्वकाव्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संपादक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी संपादित केलेल्या ‘डहाळी’ ह्या विश्वविक्रमी अनियतकालिकाच्या 1000व्या विशेषांकाचे प्रकाश ‘दिलासा ‘ केन्द्रातील विशेष मुलांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला.
तसेच डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी खास बालांसाठी ‘बे दुणे चकली ‘ ह्या त्यांच्या विश्वविक्रमी एकपात्री विनोदी कार्यक्रमाचा 27000 वा प्रयोग सादर करुन मुलांना मनमुराद हसवले.गुणी बालांना ‘ मिठु मिठु पोपट’ तसेच हाहाहा लाफ इंटरनॅशनल’ ॲवाॅर्डसही डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी प्रदान केले.
सदर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी’ दिलासा’ संस्थेचे प्राचार्य विकास पवळे होते. स्टार ऑफ लाल किताब ॲवाॅर्ड विजेत्या डाॅ.सीमा गाडेकर,भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीचे कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग,ज्येष्ठ साहित्यिक मंदाताई नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मीराताई पावगी , मधुकर्णिका फाउंडेशन संस्थेच्या संस्थापक, अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे आदि मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.
“डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी विशेष बालांसाठी निरपेक्षपणे हजारो एकपात्री कार्यक्रमाचे प्रयोग करुन ख-या अर्थाने विशेष बालांना दिलासा दिला’ असे प्रतिपादन मंदाताई नाईक यांनी आपल्या प्रमुख भाषणात केले. याप्रसंगी डाॅ.सीमा गाडेकर म्हणाल्या वयाच्या सत्तरीतही मुलांमधे मूल होऊन त्यांचे मनोरंजन सातत्याने करत रहाणे ही प्रेरणा समाजाने डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्याकडूनच घेण्यासारखी आहे.
मधुकर्णिका सासवडे आणि श्रीनिवास तेलंग यांनी बालांकडून गाणी म्हणून दाखवली. डाॅ.मधुसूदन घाणेकर आणि मान्यवरांच्या शुभहस्ते बालांना खाऊ वाटप करण्यात आले. मधुरंग संस्थेच्या उपाध्यक्ष मेघना मधुसूदन घाणेकर यांनी अतिथींचा सन्मान केला. प्रतिभा शिंपी यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले.सुनिल मर्तनवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एका विशेष बालिकेच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.समारोपात विशेष मुलांनी शिवरायांच्या चरित्रावर नृत्यगीते सादर केली.



