Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

Thank’s to you व्हाट्सअँप…!!

सौ.अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जि अहिल्यानगर

0 4 8 2 8 7

Thank’s to you व्हाट्सअँप…!!

अहो आश्चर्यम..! असंच वाटलं असेल ना माझ्या लेखाचे शिर्षक वाचून! नाही तर खूप रागही आला असेल! ज्या मोबाईलने आणि व्हाट्सअपने लहान थोरासह बुजुर्गाना व्यसनच नव्हे तर वेड लावलय. त्याला कोणी असं ‘thanks to you’ म्हणावं!. पण मी तरी त्याला thank you! असंच म्हणेल. कारण व्हाट्सअप आलं आणि जुनी माणसं मिळाली. कधीतरी कुठेतरी भेट झालेली, एक तास, एक दिवसाचा सहवास लाभलेली माणसं सुद्धा जोडली गेली.

याहीपेक्षा नात्यांच्या पलीकडची माणसे मिळाली ती या व्हाट्सअपच्या माध्यमातून. माझ्यासाठी म्हणाल तर मी पेशाने शिक्षिका. 1992- 93 पासून मी शिक्षिका म्हणून काम करत होते त्या काळी मोबाईल, फोन अशी माध्यमं नव्हती.त्यावेळी शाळा सोडून गेलेल्या मुलांची नाव ही आता विसरत चालली होती. पण या व्हाट्सअप ने मात्र ते पुन्हा भेटू लागले. अन् माझ्या बालपणीच्या म्हणजे इयत्ता पहिलीपासून एका वर्गात असलेल्या… पण पुढे मोठ्या झाल्यावर जबाबदारीच्या आणि संसाराच्या बाजारात हरवलेले मैत्रिणी या व्हाट्सअप मुळेच मला भेटल्या.. आणि पुन्हा जणू काहीआमचं बालपण परत आलं.. आणि मन ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ म्हणत नाचू लागले.

मी 1992 पासून शिक्षिका म्हणून कार्यरत होते.. त्याकाळी मोबाईल फोन अशी संपर्क माध्यमं नसल्यामुळे त्यावेळी माझ्या हाताखाली कोणती मुलं शिकून गेली तेही आता लक्षात नव्हतं. पण काल मला अचानक एका unknown नंबर वरून फोन आला. नमस्ते मॅडम, ओळखलं का? मी नाही म्हणताचं तिकडून सांगितले, मॅडम,अहो मी तुमचा विद्यार्थी उद्धव…..उद्धव देवकर!. तरी पण मी स्तब्धच!. पुन्हा तो म्हणाला, तुम्ही स्वानंद विद्यालयात होतात ना, तेव्हा आम्हाला मराठी शिकवत होता. व्याकरण तर इतकं छान शिकवलं की, मी ही आज शिक्षक होऊन विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीने व्याकरण शिकवतो. तुम्ही आम्हाला आईचे प्रेम दिलं,माया दिली. त्यामुळेच तर आम्ही घडलो. ओह..!
मग डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि त्याच्या बोलण्यातून आठवणींचा एक एक पदर असा उलगडत गेला.

92-93 साली मी स्वानंद विद्यालय चिंचोली काळदात, ता. कर्जत येथे शिक्षिका म्हणून काम केलं होतं. त्या शाळेतील हा माझा विद्यार्थी. आज तो ही शिक्षक झाला आहे व त्याचं संस्थेत शिक्षक या पदावर कार्यरत आहे. एक उपक्रमशील शिक्षक म्हणून तो विद्यार्थीप्रिय सुद्धा झाला आहे. मग संवादातून त्याने अनेक विद्यार्थ्यांची नावे सांगितली. त्यांना ही माझा फोन नंबर दिला आणि मग काय? मला व्हाट्सअप वर एसएमएस आणि फोनचा पाऊसच पडला. प्रदीप, विद्या, धनु, शिवा… असे एकेकाचे फोन येऊ लागले. मॅडम,तुमच्या सारखे शिक्षक कायम स्मरणात राहतील.

मॅडम, तुम्ही अगदी टीव्हीतल्या सारखं शिकवायच्या. मॅडम, तुम्ही आम्हाला आईची माया दिली, जीव लावला. हे असे फोनवरचे 40 45 वयापर्यंत जाऊन पोहचलेले माझे विद्यार्थी जेव्हा असं बोलत होते तेव्हा तर मला *आकाशी ठेंगण वाटू लागलं* माझ्या जीवनाचे सार्थक झालं.!. असंही वाटलं!.अरे हो….! व्हाट्सअप मोबाईल यांचं हेच एक उदाहरण नाही तर मागच्या वर्षी मी जेव्हा सेवानिवृत्त झाले तेव्हा बेलापूर खुर्द येथील ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी यांनी माझ्या सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार केला. त्याचे फोटो व्हायरल झाले. ते गावातले 96-97 च्या बॅचच्या मुलांनी पाहिले आणि तेव्हा त्यांनी ही माझा नंबर मिळवला आणि मला फोन केला. एक विद्यार्थी दत्ता वाकडे याचा फोन आला. तो म्हणाला मॅडम, तुम्ही सेवानिवृत्त झालात?असं काय कसं काय? एक शिक्षक तीन पिढ्यांना शिकवतो मग असं कसं असं म्हणता..!!

त्याच्या म्हणण्याचा उद्देश एकच. त्याचा मुलगाही माझ्या हाताखाली शिकला होता. जणू काही नातू आता माझ्याकडे शिकावा हीच त्याची इच्छा असं मला वाटलं. बोलता बोलता तो खूप भावुक झाला. मॅडम आम्हालाही तुमचा सत्कार करायचा आहे. तुम्ही माझ्या घरी या असं तो बरच काही बोलला. त्याने नंतर इतर मित्रांना सांगितलं आणि बघता बघता नामदेव शंकर, चंदू, माया, मनीषा छाया असे एक एक करीत 40 विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र आले आणि त्यांनी माझा निवृत्तीचा जो शाही सोहळा केला तो,’न भूतो न भविष्यती’! त्यावेळी त्यांच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ऐकून तर मी भारावून गेले.एक विद्यार्थिनी म्हणाली, मॅडम, अहो तुम्ही खूप भाग्यवान आहात..आईला तर दोन-तीन मुलं असतात, पण तुम्हाला तर आम्ही एवढी मुलं आहोत, खरच तुम्ही नशीबवान आहात.! एका विद्यार्थिनींना sms केला मॅडम, तुमचा नंबर मिळाला तुमचा फोटो पाहिला आणि मला जणू माझा विठ्ठल भेटला! हे आणि असेच एस एम एस फोन पाहून आज निवृत्तीनंतर मनाला जी शांती समाधान वाटतं ते शब्दात व्यक्त करता येत नाही. असं वाटतं सार्थक झालं जीवनाचं..!

एवढंच नव्हे तर काल परवाच माझी प्रमिला नावाची एक मैत्रीण भेटली. तिने तर ‘अतिथी देवो भव’ या उक्तीप्रमाणे माझं आदरातिथ्य केलं. ती देखील फक्त एकदाच मला या व्हाट्सअपच्या माध्यमातून भेटली होती. आजही असे फोन येतात व्हाट्सअप वरून sms येतात.. लांब उडून गेलेली पाखरं माझ्या मनाभोवती रुंजी घालत आहेत. ही सारी किमया त्या व्हाट्सअप ची आणि म्हणून म्हणावसं वाटतं…

“जपून आणि योग्य पद्धतीने करावा वापर व्हाट्सअपचा’
तोच आहे अनमोल ठेवा आपल्या गत जीवनाचा
त्याच्या माध्यमातून गुंफला जातो धागा रेशमी नात्यांचा,
आणि मग हाती लागतो ठेवा सुखद आनंदाचा…”

मला माझ्या आयुष्यात माझे अनेक विद्यार्थी या व्हाट्सअपमुळे भेटले त्यामुळे मला मौलिक आनंद मिळाला. म्हणूनच तर ती मी शतदा म्हणेल,’थँक्स टू व्हॉट्सअप’ अजून एक अनमोल ठेवा ही मला याच व्हाट्सअपमुळे मिळाला ते म्हणजे माझे गुरुवर्य भेटले. “सात वार व शतदा जन्मून फिरायचे का हे ऋण हे हातून.” आनंदाने माथा वाहिन त्यांच्या चरणी तेचं मला भूषण”. असे माझे गुरुजन तेही याच माध्यमातून भेटले. त्यांच्यामुळे फक्त शैक्षणिक व्यक्तिमत्व विकास झाला असे नव्हे तर संपूर्ण जीवन त्यांच्यामुळे कळले. अनुभवांची क्षितिज रुंदावली.

वर्तमानाशी संघर्ष करण्याची उमेदआणि भविष्याचा वेध घेण्याची जाणीव करून देणाऱ्या या शिक्षकांना या निमित्ताने प्रत्यक्ष भेटता आले.त्यांच्या चरणी नतमस्तक होता आले. तुम्हाला ही व्हाट्सअपचे असे अनेक फायदे झाले असतीलच. व्हाट्सअप हे आजच्या काळात संपर्क ठेवण्याचा एक प्रभावी आणि सोयीस्कर मार्ग आहे यापेक्षा अनेक फायदे तर आहेत. फार उपयोगही आहेत.पण जशा नाण्याच्या दोन्ही बाजू छापाच असू शकत नाही. तशा या व्हाट्सअप चा दुरुपयोग ही आहे तो फार थोडा..म्हणूनच तर जेवणात जसे मीठ आणि साखरेचे प्रमाण मर्यादित आणि योग्य ठेवावे लागते, तसा व्हाट्सअप चा वापरही मर्यादित ठेवा आणि मग बघा जे व्हाट्सअप चा राग राग करतात ते ही म्हणतील, ‘Thanks to you व्हाट्सअँप !’.

सौ.अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहिल्यानगर
प्रसिद्ध कवयित्री,लेखिका, आदर्श शिक्षिका

3.7/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे