‘न्यायमंथन २०२६’मध्ये विद्यार्थ्यांचा प्रभावी कायदेविषयक युक्तिवाद
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

‘न्यायमंथन २०२६’मध्ये विद्यार्थ्यांचा प्रभावी कायदेविषयक युक्तिवाद
ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉमध्ये अभिरूप न्यायालय स्पर्धा उत्साहात; विद्यार्थी परिषदेतील गुणवंतांचा गौरव
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग, ३० सप्टेंबर २०२६ : ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉमध्ये ‘न्यायमंथन २०२६’ या महाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांचे कायदेविषयक ज्ञान वृद्धिंगत करणे, चिकित्सक व तर्कशुद्ध विचारांना चालना देणे, कायदेविषयक संशोधन कौशल्य विकसित करणे आणि प्रभावी न्यायालयीन युक्तिवादाची संधी उपलब्ध करून देणे हा स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता.
‘न्याय’ म्हणजे कायदा, तर ‘मंथन’ म्हणजे एखाद्या विषयाची सखोल चिकित्सा. या दोन्ही संकल्पनांचा संगम असलेल्या ‘न्यायमंथन’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजाचा अनुभव, कायदेशीर मुद्द्यांचे विश्लेषण आणि प्रभावी युक्तिवाद सादरीकरणाचे व्यासपीठ उपलब्ध झाले.
स्पर्धेसाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. डॉ. गौतम पाटील यांनी परीक्षक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या युक्तिवादाचे परीक्षण केले तसेच त्यांना मौलिक मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्या डॉ. नीलम हजारे यांनी सहपरीक्षक म्हणून भूमिका बजावली.
स्पर्धेची प्राथमिक फेरी २८ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली. विविध संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रभावी युक्तिवाद, कायदेविषयक संशोधन आणि सादरीकरण कौशल्याचे दर्शन घडविले. परीक्षकांच्या मूल्यांकनानंतर कु. आर्य गौतम पाटील, मयुरेश जोशी आणि पारस धोदरे यांनी विजेतेपद पटकावले. कु. कृष्णाली घरत, कु. असबा धानसे आणि कु. सानिका घरत यांनी प्रथम उपविजेतेपद मिळविले. तसेच सर्वोत्कृष्ट संशोधक या पुरस्कारासाठीही या तिघींची निवड करण्यात आली. कु. मानसी गरुड, कु. परी कासार आणि कु. अर्यान येलवे यांनी द्वितीय उपविजेतेपद पटकावले.
सर्वोत्कृष्ट मेमोरियल विजेता संघ म्हणून कु. प्रणव गावडे, श्री. मिथिलेश राऊळ आणि कु. तनुज म्हात्रे यांची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट प्रशंसक मेमोरियलसाठी श्री. दादासाहेब सोनटक्के, श्री. किरण तिळक आणि श्री. रुपेश चव्हाण यांची निवड झाली. सर्वोत्कृष्ट मूटर म्हणून मयुरेश जोशी यांची निवड करण्यात आली. अंतिम निकालाची पडताळणी करून विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘विद्यार्थी परिषद २०२६–२०२७’ अंतर्गत गुणवत्तेच्या (Merit) आधारे विविध विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात आली. वर्ग प्रतिनिधी, सांस्कृतिक प्रतिनिधी, क्रीडा प्रतिनिधी, कायदेशीर सहाय्यक प्रतिनिधी, अभिरूप न्यायालय प्रतिनिधी, डी.एल.एल.ई. प्रतिनिधी आदी पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच कु. आर्य गौतम पाटील यांची विद्यार्थी परिषदेच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली.
नॅक समन्वयक प्रा. निलम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. हर्षदा चेवले आणि प्रा. कौशिक बोडस यांनी तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी प्रा. डॉ. संदिप घाडगे, प्रा. पियुषा पाटील, प्रा. चिन्मय राणे, प्रा. सुरज पुरी, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायमंथन २०२६’मुळे विद्यार्थ्यांना अभिरूप न्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयीन कामकाजाचा अनुभव मिळण्याबरोबरच कायदेविषयक संशोधन, तर्कशुद्ध विचार, प्रभावी संवाद आणि न्यायालयीन युक्तिवाद या कौशल्यांचा विकास करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर विद्यार्थी परिषदेच्या निवडीमुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना आणि महाविद्यालयीन उपक्रमांतील सक्रिय सहभागाला चालना मिळाली.



