चरण स्मरण
विठ्ठल चरणी रे लागले ध्यान
किती प्रसन्न वाटते माझे मन!
विठू माऊलीची सेवा जीवन
भजन हेच कीर्तन आनंदवन!
तुझ्या स्मृतील अर्पिले जीवन
रोज मुखी रे हरिपाठ म्हणून!
दिवसाची सुरुवात पसायदान
चिंता असते ना चिते समान!
विठ्ठलाचे स्मरण मंदिरी बसून
हाती वाजती टाळ हे खनखन
अनुभवले नडते कुणा वाचून
तुझ्या नामाची ताकत पाहून!
आनंदी जगतो रे माझे जीवन
विसावला जीव तुला भेटून!
पडे बाहेर हे अभंग मुखातून
ज्ञानबोध वेचावे मी मनोमन!
व्हावे वाटते या चरणी विलीन
विठ्ठला घे भक्ती तूच समजून!
अनमोल किती तुझेच चरण
नित्य घडावे केवळ स्मरण!
संधीचा असा रे योग पाहून
भेटतो तुजला मी हृदयातून!
भक्तीचा भुकेला विठू पाहून
हरपले आज हे हळवे तनमन
विठ्ठला तुझे उपकार जाणुन
चित्ती साठविले मी समाधान
कलियुगाचे हे अंतिम चरण
ध्यानी मनी सदैव हे स्मरण!!
अशोक महादेव मोहिते
बार्शी,जिल्हा सोलापूर
==========



