घरचा गणपतीही नवसाला पावतो
अनिता अनिल व्यवहारे ता. श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर

घरचा गणपतीही नवसाला पावतो
“शोधिसी मानवा राऊळी मंदिरी,
नांदतो देव हा आपल्या अंतरी…”
या गाण्याची सार्थकता आपल्या सगळ्यांनाच पटलेली आहे. देवाचा शोध घेताना आपण मंदिरात जातो, देवळाच्या पायऱ्या चढतो, दर्शनासाठी रांगेत उभे राहतो; पण त्याच वेळी आपल्या अंतरात वसलेल्या देवाला मात्र कधी कधी विसरून जातो. अर्थात, मंदिरात जाणं, देवदर्शन घेणं हा आपल्या श्रद्धेचा भाग आहे. प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगळी असते. कुणाला देवळात जाऊन दर्शन घेतल्याने समाधान मिळतं, मनःशांती मिळते, तर कुणाला आपल्या घरच्या देव्हाऱ्यातच देव सापडतो.
काल व्हॉट्सॲपवर एक छोटंसं होर्डिंग पाहिलं. त्यावर लिहिलं होतं “घरचा गणपतीही नवसाला पावतो!” वाचताना आधी थोडंसं हसू आलं!! मनाचा थोडासा गोंधळही उडाला; पण त्याच क्षणी मनात एक विचार चमकून गेला, हे अगदी खरं तर आहे! गणेशोत्सव आला की आपण किती भक्तीभावाने, श्रद्धेने आपल्या घरात गणरायाची स्थापना करतो. सुंदर सजावट करतो, आरास करतो, नैवेद्य दाखवतो, मनोभावे आरती करतो, प्रार्थना करतो. आपल्या घरात आणलेला बाप्पा म्हणजे केवळ एक मूर्ती नसते; तो आपल्या संस्कृतीचा, संस्कारांचा, श्रद्धेचा आणि आनंदाचा केंद्रबिंदू असतो.
पण मनात एक प्रश्न आला…! आपण या आपल्या बाप्पाशी बोलतो का? मन मोकळं करून संवाद साधतो का? त्याच्यापुढे बसून आपल्या मनातलं सुख-दुःख त्याला सांगतो का? आपल्या एखाद्या कार्याची सिद्धी व्हावी, यश मिळावं म्हणून आपण दूरवरच्या मंदिरात जातो, नवस बोलतो. एखाद्या देवस्थानात तासन्तास दर्शनाच्या रांगेत उभे राहतो. यात काहीही गैर नाही. श्रद्धा ही प्रत्येकाची आपापली असते. पण मग आपल्या घरात पाहुणा म्हणून नव्हे, तर आपला लाडका बाप्पा म्हणून आलेल्या गणरायाकडे आपण किती मनापासून पाहतो?
संत तुकडोजी महाराजांची एक सुंदर ओळ आठवते, “देव आपल्या अंतरी, आम्ही जातो तीर्थावरी…” खरंच… मुद्दा कुठे जाण्याचा नाही; मुद्दा आहे तो आपल्या अंतरी असलेल्या देवाला ओळखण्याचा.
“भेटतो देव का पूजन अर्चनी,
शोध रे दिव्यता आपल्या जीवनी…”
मग आपल्या घरी आणलेल्या या विघ्नहर्त्यामध्येच ती दिव्यता का शोधू नये? त्याच्यापुढे दोन क्षण शांत बसावं. मनातलं त्याला सांगावं… आपल्या चुका कबूल कराव्यात…त्याने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी… आणि यथाशक्ती मनापासून त्याचं पूजन करावं. कारण बाप्पाला कदाचित मोठ्या सजावटीपेक्षा मनापासून केलेली भक्ती अधिक प्रिय असावी. सोन्या-चांदीच्या अलंकारांपेक्षा श्रद्धेचा निर्मळ भाव त्याला अधिक भावत असावा. यावर्षी तसंही मला कुठल्याही मंदिरात जाणं शक्य झालं नाही. आणि त्यातच त्या होर्डिंगवरचं ते वाक्य नजरेस पडलं “घरचा गणपतीही नवसाला पावतो!”
त्या एका वाक्याने मनातला विचारच बदलून गेला. बाप्पा कुठे आहे, यापेक्षा आपल्या मनात त्याच्यासाठी किती श्रद्धा आहे, हेच अधिक महत्त्वाचं आहे, असं प्रकर्षाने जाणवलं. आणि त्याच संध्याकाळी मी माझ्या घरच्या बाप्पासमोर शांत बसले. डोळे उघडे ठेवून बाप्पाची मूर्ती डोळे भरून पाहिली. त्या क्षणी माझा बाप्पा मला किती गोड दिसतोय, किती आपलासा वाटतोय, याची जाणीव झाली. त्याच्या त्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहताना मन नकळत भरून आलं. आणि मग मनोभावे प्रार्थना केली.
“बाप्पा, सर्व काही दिलं आहेसच… सुख-दुःखाची जाणीव दिलीस, माणसं दिलीस, नाती दिलीस, प्रेम दिलंस आणि प्रत्येक परिस्थितीत उभं राहण्याचं बळही दिलंस. आता तुझ्याकडे मागावं तरी काय? फक्त एवढंच दे….!! “माझ्या मनातली तुझ्यावरची श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नकोस. संकट आलं तरी तुझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नकोस. माझ्या ओठांवर तुझं नाम राहू दे आणि प्रत्येक माणसात तुझं अस्तित्व पाहण्याची दृष्टी दे.” माझ्या घरात तू काही दिवसांसाठी येतोस; पण माझ्या मनात मात्र कायमचा वास कर. माझ्या सुखात तुझा आशीर्वाद असू दे आणि दुःखाच्या क्षणी ‘मी आहे ना’ असं सांगणारा तुझा अदृश्य हात माझ्या पाठीवर असू दे.
मला काही मागायचंच असेल तर एकच मागणं आहे. “माझ्या मनाचा गाभारा सदैव निर्मळ ठेव आणि तिथे तुझं स्थान कायम राहू दे.” त्या दिवशी जाणवलं…!! नवसाला पावणारा बाप्पा फक्त एखाद्या मंदिरात नसतो; तो आपल्या घरच्या देव्हाऱ्यातही असतो आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाच्या गाभाऱ्यातही असतो. म्हणूनच कदाचित त्या छोट्याशा होर्डिंगवरचं वाक्य मला शेवटी एक मोठी शिकवण देऊन गेलं. “बाप्पा कुठे आहे, यापेक्षा आपण त्याला कुठे शोधतो हे महत्त्वाचं; आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे.. तो आपल्या अंतरी किती आहे, हे महत्त्वाचं!” देव शोधण्यासाठी दूर कुठे जाण्याची गरज नसते. मनापासून डोळे उघडले की, तो आपल्या घरात दिसतो, आणि डोळे मिटून अंतर्मनात डोकावलं की तो आपल्या आतच सापडतो.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!!
अनिता अनिल व्यवहारे
ता. श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर
========



