Breaking
ई-पेपरकविताकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

“मचाणबाज बळीराजाची, सार्‍या शेतशिवारात गाज.. कुणी जाणावे हे राज…!”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 7

“मचाणबाज बळीराजाची, सार्‍या शेतशिवारात गाज.. कुणी जाणावे हे राज…!”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

बारा महिने चोवीस तास, अष्टौप्रहर एकच ध्यास’, खळ्यात दिसावी मोत्याची रास. मळ्यात राबतो तासनतास. ऋतु असो कोणताही बळी दिसेल शिवारात हमखास. अगदी वैशाख वणव्याचा दग्द दाह देहात पचवत बळीराजा मातीत कसत असतो. पुढे येणार्‍या मृग रोहिणी नक्षत्राची हिरवी स्वप्ने डोळ्यात सजवत. पर्जन्यराजाची आतूरतेने वाट पहात असतो. वळीवाच्या पाठोपाठ पावशा घूचा स्वर आख्ख्या आसमंतात घुमला की, बळी मनातल्या मनात सुखावतो. निसर्ग शास्त्राचे अडाखे बांधत बांधत भरली मूठ कूरीवर ठेवून मोठ्या हौसेने काळ्या आईची ओटी भरतो.. हलक्या मध्यम सरींच्या शिडकाव्यात मातीच्या उदरात पेरलेल्या बीजाला कोवळे अंकूर फुटतात आणि मातीची पोफडे हळूवार वर उचलून ती जमिनीबाहेर डोकावतात. तेव्हा बळी मनातल्या मनात हसत असतो.

समाधानाचा श्वास निश्वास घेत देत त्या रोपट्यांला एक एक फुटणारे पान तो नजरेत साठवून घेत असतो. त्याच्या मुळाशी घामाच्या धारांचा अभिषेक करत करत त्याला मोठे होताना पहात असतो. रोपाच्या पोटरीत लोंबीचे लुसलुशीत सृजन बघताना श्रमसाफल्याच्या सुखात नहात असतो.. हळूहळू लोंबी पूर्णत्वाने भरून मोत्यांच्या दाण्यांचा भार पेलत. जणू मातीचे ऋण व्यक्त करण्यास खाली झुकत असते. आणि बळीचे मन थोडेसे चिंतित होते. पोटरीतून बाहेर आलेली गच्च टपोरी कणसे खळ्यापर्यंत सुरक्षित नेण्याची जबाबदारी आता त्याला निभावायची असते. कोवळ्या गोडसर दाण्यावर ताव मारण्यास पाखरांचे थवे, रानटी जनावरांचे कळप सज्जच असतात. आणि मग बळी शिवारात मध्यभागी सुरक्षित मचाण उभारतो.

आख्खे शिवार नजरेच्या टप्प्यात येईल इतकी उंची देवून त्या मचाणावर गोफण गुंड्यासह तयारीत राहतो. दिवसरात्र डोळ्यात तेल घालून हातातोंडाशी आलेल्या घासाचे रक्षण करत असतो. कडाक्याच्या थंडीत फाटकी तुटकी गोधडी गुंडाळून हाकारे देत राहतो. ना वयाची पर्वा करतो ना भयाला भीक घालतो. कललेल्या वयातही उभारीची हिम्मत बांधून कंबर कसून उभा राहतो. कारण त्याच्या डोळ्यासमोर दिसत असते फक्त धान्याची रास. परिवाराला सुख समृद्धीचा घास.. लेकीचे लग्न. सावकाराचे कर्ज आणि घरधनीनीची थोडीशी हौस. एक भरभक्कम रास या सर्व स्वप्नांची पूर्तता करणार असते.

काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरीता आदरणीय राहुल दादांनी भरल्या शिवारात मचाणावर पहुडलेला मात्र जागता पहारा देणार्‍या बळीराजाचे चित्र दिले होते. चित्र सर्वांनाच चिरपरिचित असल्याने खूप सुंदर हायकूची बरसात झाली. ‘शिलेदार हो…’ गेली चार वर्षाहून अधिक काळ आपण हायकू लेखन करता आहात. त्यामुळे दर्जा आणि कलात्मकतेचे दर्शन होणे अपेक्षित आहे. चित्राचे सूक्ष्म अवलोकन करा. चिंतन करा आणि मगच रचना लिहा. सतरा अक्षरांच्या जादूचे गारूड वाचकमनावर झाले पाहिजे. शब्दांची पुनरावृत्ती कटाक्षाने टाळून कल्पक हायकू निर्मितीसाठी प्रयत्नशील रहा. सर्वांच्या लिखाणाला शुभेच्छा..! आणि आज मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनःपूर्वक आभार.

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
सहप्रशासक/ परीक्षक/ लेखक
©मराठीचे शिलेदार समूह

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे