“…जेव्हा नाराजी नाट्यातील छोटासा रुसवा समाज माध्यमांच्या चौकात येऊन उभा राहतो”; प्रशांत ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“…जेव्हा नाराजी नाट्यातील छोटासा रुसवा समाज माध्यमांच्या चौकात येऊन उभा राहतो”; प्रशांत ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
हल्ली आपण सर्वचजण याचा अनुभव घेत असतो. कोण, कधी, कुठे, कसा आपल्यावर नाराज होईल याचा काही नेम नाही. कुणी फोन केला नाही म्हणून नाराजी. केला, पण आधी केला नाही म्हणून नाराजी. कार्यक्रमाला बोलावलं नाही म्हणून नाराजी. बोलावलं, पण विशेष आग्रह केला नाही म्हणून नाराजी. सत्कार केला नाही म्हणून नाराजी आणि केला तरी अपेक्षित शब्दांत केला नाही म्हणून नाराजी! पुढेही नाराजी मनोमनी अशीच वाढत जाते. त्यातून काही माणसं आपल्या आयुष्यातून दूर जात नाहीत फक्त त्यांच्या मनापर्यंत पोहोचणारा रस्ता हळूहळू बंद होत जातो. कधी एखादा न बोललेला शब्द, कधी अपेक्षेप्रमाणे न मिळालेला मान, कधी क्षुल्लक दुर्लक्ष आणि मनाच्या कोपऱ्यात रुसव्याची एक बारीकशी रेघ उमटते.
सुरुवातीला ती रेघ कुणालाच दिसत नाही. पण आपण तिला मनात जपत राहिलो की, तीच पुढे नात्यांच्या मध्ये भिंत बनते. नाराजी माणसाच्या मनाइतकीच जुनी आहे. मन आहे, भावना आहेत, अपेक्षा आहेत, त्यामुळे कुणाच्या शब्दाने मन दुखणे, कुणाच्या वागण्याने खटकणे किंवा आपल्याला दुर्लक्षित केल्यासारखे वाटणे साहजिकच. नाराजी येते आणि तीही माणूसपणाचाच एक भाग आहे.
पण गंमत अशी की, आजकाल नाराजीही खाजगी राहिलेली नाही. पूर्वीचा रुसवा दोन माणसांच्या मनात उमटायचा पण आता त्याला रंगमंच मिळतो, प्रेक्षक मिळतात आणि कधी कधी प्रकाशझोतही!
मग थेट संवाद नको. त्याऐवजी सोशल मीडियाच्या भिंतीवर एखादी सूचक ओळ उमटते. “काही माणसं वेळ आली की आपली किंमत दाखवतात…” नाव कुणाचं नाही पण संबंधित व्यक्तीने ते स्वतःचं समजावं, अशी मनोमन केलेली व्यवस्था! आणि मग प्रतिक्रिया येतात “अगदी खरं!” “मनातलं बोललात!” “काही लोक कधीच बदलत नाहीत!” अशा रीतीने घराच्या उंबरठ्यावरचा छोटासा रुसवा समाजमाध्यमांच्या चौकात येऊन उभा राहतो. खरं तर प्रश्न नाराजीचा नाही प्रश्न आहे तिच्या प्रदर्शनाचा. मन दुखलं असेल तर समोरच्याशी बोलावं. “तुझ्या या वागण्याने मला वाईट वाटलं, एवढं सांगण्यात कमीपणा नसतो. उलट, नातं वाचवण्याची तीच खरी सुरुवात असते.
पण आपण संवादापेक्षा गैरसमजाला, स्पष्टीकरणापेक्षा निष्कर्षाला आणि कधी कधी नात्यापेक्षा अहंकाराला अधिक महत्त्व देतो. म्हणून कधी स्वतःलाच विचारावं…!! “मी खरंच दुखावलो आहे, की माझ्या अपेक्षांना धक्का बसला आहे?” उत्तर प्रामाणिक असेल, तर अनेक नाराजीची नाटके पडद्याआड जातील. कारण, नाती ही रंगमंचावर सादर करण्याची पात्रे नसतात. त्यांना टाळ्यांची नव्हे, मनाच्या संवादाची गरज असते. रुसवा असू द्या… अबोला क्षणभर असू द्या… जिभेवर लगाम असू द्या… पण नात्यांवर पडदा पडू देऊ नका… नाराजीला प्रेक्षक मिळाले की नाट्य रंगते.
पण संवाद मिळाला की नातं वाचतं! हा आरंभ आधीच्या तुलनेत अधिक हळवा आणि चिंतनशील आहे त्यानंतरचा उपरोध अचानक न वाटता नैसर्गिकपणे खुलतो. आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धे’साठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘नाराजी नाट्य’ हा विषय दिला. तसे पाहता हा भावनाप्रधान विषय होता. पण समूहातल्या सर्व दादा ताईंनी सुंदर पद्धतीने हा विषय हाताळला, तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन….. धन्यवाद.
प्रशांत ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/ लेखक/ समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



