जे. एस. एम. महाविद्यालयात एड्स जनजागृती, मानसिक आरोग्य आणि नशामुक्त युवक – काळाची गरज या विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

जे. एस. एम. महाविद्यालयात एड्स जनजागृती, मानसिक आरोग्य आणि नशामुक्त युवक – काळाची गरज या विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग, (दि.9): युवकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांच्यामध्ये एड्सविषयी जागरूकता निर्माण व्हावी, मानसिक आरोग्याचे महत्त्व पटावे आणि व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, या उद्देशाने जनता शिक्षण मंडळाच्या जे. एस. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग–रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रेड रिबन क्लब अंतर्गत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात समुपदेशक श्रीमती अर्चना जाधव यांनी एड्सविषयी सविस्तर माहिती देताना एचआयव्ही संसर्गाची कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, तपासणीचे महत्त्व आणि एड्सग्रस्त व्यक्तींशी भेदभाव न करता त्यांना सन्मानाने वागणूक देण्याची गरज स्पष्ट केली. तसेच विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याबाबत सजग राहावे, तणावाचे योग्य व्यवस्थापन करावे आणि गरज भासल्यास समुपदेशनाची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मार्गदर्शक श्रीमती सुजाता तुळपुळे यांनी संतुलित व पोषणमूल्ययुक्त आहाराचे महत्त्व विशद केले. निरोगी जीवनशैली, योग्य आहार आणि व्यसनांपासून दूर राहणे हे सुदृढ आरोग्याचे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगत त्यांनी ‘नशामुक्त युवक हीच सशक्त राष्ट्राची ओळख’ हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. तंबाखू, मद्य आणि इतर व्यसनांपासून दूर राहून स्वतःचे आरोग्य जपावे तसेच समाजात व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. डॉ. गौतम पाटील आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी शुभेच्छा संदेश देत सांगितले कि, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा आरोग्यविषयक जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन महत्वाचे आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी मदत होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी आठवले यांनी केले, तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रविण गायकवाड यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी डॉ. पंकज घरत तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता, सकारात्मक दृष्टिकोन आणि व्यसनमुक्त जीवनशैलीची प्रेरणा निर्माण करणारा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. ‘निरोगी मन, सुदृढ शरीर आणि व्यसनमुक्त जीवन’ हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.



