Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

मनाचे घर, माणसाचं हृदय…की अजून काही..?

अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जि अहिल्यानगर

0 4 8 2 9 4

मनाचे घर, माणसाचं हृदय…की अजून काही..?

‘माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले’. कवी सुधीर मोघे यांची ही कविता नुकतीच वाचली आणि मी विचार करू लागले मन….!! ना काना ना मात्रा ना वेलांटी ना ऊकार ना आकार… असा हा दोन अक्षरी शब्द….. पण त्याची व्याप्ती किती मोठी! त्याच्या पुढे न लावा नमन त्याच्या मागे न लावा मनन न ते कुणाला दिसलं ना ते कुणाला दिसतं. पण ते नाही म्हणायची हिंमत नाही कोणाची देव तरी आपण पाहिलाय चित्राच्या स्वरूपात मूर्तीच्या रूपात मी शेंदूर लावलेल्या दगडात आणि माणुसकी जपणाऱ्या माणसात. त्यामुळे तो कसा दिसतो कसा असतो सांगता येतं पण मन या मनाचं काय ते दिसत नाही… पण तरीही त्याबद्दल सांगता येतं. ‘देवाचे घर स्वर्ग, तर मनाचे घर…..’? माणसाचं हृदय…की अजून काही..?

या मनाबद्दल खात्रीपूर्वक कोणीच काही सांगू शकत नाही. पण त्याबद्दल मात्र कल्पना खूप केल्या जातात. कारण, ‘जो न देखे रवि ते देखे कवी’. कविता कल्पनेतून सारस्वतांच्या साहित्यातून, संतांच्या अभंगातून वर्णन केल्याप्रमाणे मनाची व्याख्या करता येते. कारण या ग्रंथांमध्ये मनाचा व तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी याच मनाला भ्रमराची उपमा देत, ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा, सांडी तू अवगुरु रे भ्रमरा” मनाबद्दल सांगितलं आहे. तत्त्वज्ञानामध्ये तर जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणाऱ्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती इब्राहम भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी जिथे होतात, त्या ठिकाणाला ‘मन’ असे म्हणतात. पण तरीही एक शंकाच. कारण या सगळ्या गोष्टींचा केंद्र तर मेंदू आहे. इथे मनाची व्याख्या संदिग्ध वाटते.

अशावेळी बहिणाबाईंची कविता आठवते. त्यांनी तर मनाच्या खूप वेगवेगळ्या संकल्पना केल्या आहेत. त्या म्हणतात,’ मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात’ ‘आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात’. इतक चंचल मन…. कोणी म्हणतो मन हे एक एनर्जी आहे, ती आपल्याला दिसत नाही. पण जाणवते तर ना! मन कुठे असतं या प्रश्नाला उत्तर नाही? तरी
ज्या मनाचा कुणी, कधी चेहरामोहरा पाहिला नाही. तरी धनी अस्तित्वाचा ह्याच्याविण दुसरा नाही. ह्या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा असं त्याबद्दल बोललं जातं. मन कसं असतं यावर मात्र सर्वच जण बोलतात.

‘मन जसं माणसाच्या हृदयात तसं सैतानाच्या हृदयात असतं..’ कारण ते अनभिज्ञ अनाकलनीय कोडे आहे. ते सजीव की निर्जीव तेही कळत नाही. कारण एका कवीने म्हटलं, ‘माझ्या मना बन दगड’, म्हणजे निर्जीव कधी सजीव तर कधी निर्जीव लपंडावाचा खेळ असते, कधी त्याचं दुःखत तर कधी ते दुखावत, कधी सुखावतं, कधी लाडात येत, कधी रागात येतं. या मनाचं काही काही कळत नाही. इतकं ते हळवं असतं. या हळवेपणामुळेच माणसातल्या माणुसकीची श्रीमंती समजून येते. म्हणूनच माणूस भावना जगायला आणि जाणायला शिकतो. दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी त्यामुळेच तर आपल्या डोळ्यात घेऊ शकतो.

समर्थ रामदास स्वामी यांनी तर या मनाला खूप सुंदर उपदेश केलेला आपल्याला ज्ञात आहेच. इतकं सगळं असताना सुद्धा या मनाबद्दल कवी गीतकार यांनी मात्र… या मनाला शब्दात बांधून ठेवलं आहे. ‘मन वढाय वढाय’ म्हणणाऱ्या बहिणाबाईंना सुद्धा मन उमगलंच नाही, त्यामुळेच तर त्या देवाला म्हणतात…

देवा कसं देलं मन आसं नाही दुनियात
असा कसा रे तू योगी काय तुझी करामत
देवा असं कसं मन आ सं कसं रे घडलं
कुठे जागेपणी तुले असं सपान पडलं.
असो…. आता मात्र मी माझ्या मनाला एवढच म्हणेन, ‘माझिया मना जरा ऐक ना….’!

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहिल्यानगर
========

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे