“विकसनशील भारतीयांची अप्रगत मानसिकता, ‘हाच भारत आहे”; प्रशांत ठाकरे
शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धेचे परीक्षण

“विकसनशील भारतीयांची अप्रगत मानसिकता, ‘हाच भारत आहे”; प्रशांत ठाकरे
शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे परीक्षण
हा भारत आहे ! होय हा भारतच आहे…!! महागड्या गाडीत फिरणारेही येथेच आहेत आणि त्याच चालत्या गाडीतून दरवाजा उघडून पचकन रस्त्यावर थुंकणारे पण येथेच आहेत. एका हातात विज्ञानाची मशाल घेऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ झेपावणाराही येथेच आहे आणि दुसऱ्या हाताने रस्त्यावर कचरा फेकून स्वतःच्याच प्रगतीच्या वाटा अस्वच्छ करणारा पण येथेच स्वच्छ भारतचा डंका पिटत आहे.
एका बाजूला डिजिटल क्रांतीचे जगाला धडे देणारा ही आहे ना इथे… आणि दुसऱ्या बाजूला वाहतुकीचा लाल दिवा समोर दिसत असून सुद्धा चुकीच्या बाजूने येऊन सिग्नल तोडणारा पण इथेच आहे. एका बाजूला संविधानाला सर्वोच्च मानणारा पण मोठा वर्ग इथे आहेआणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या सोयीसाठी त्याच संविधानाच्या मूल्यांना विसरणारा पण इथलाच स्वतःला सुजान नागरिक म्हणत आहे. अशा अनेक विरोधाभासांच्या या विलक्षण संगमाचे नाव आहे—भारत…!!
हा भारत आहे, इथे साधी टाचणी पण नव्हती हो बनत. कमालीच्या मेहनतीने स्वातंत्र्यानंतर संघर्षाच्या राखेतून विकासाचे नवे पर्व उभे केले. बैलगाडीच्या संथ गतीपासून आधुनिक द्रुतगती मार्गांपर्यंत, पत्रांच्या प्रतीक्षेपासून क्षणात संदेश पोहोचवणाऱ्या डिजिटल युगापर्यंत आणि अन्नधान्याच्या टंचाईपासून अन्नउत्पादनातील स्वयंपूर्णतेपर्यंत भारताने प्रदीर्घ प्रवास केला आहे. चांद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ इतिहास घडवला, मंगळयानाने भारतीय बुद्धिमत्तेची पताका फडकवली आणि यूपीआयने आर्थिक व्यवहारांना नवी गती दिली. औषधनिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण, शेती, शिक्षण आणि अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रांत भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
हा भारत आहे, जिथे लोकशाहीच्या मंदिरात सामान्य माणसाचे मतही सत्तेची समीकरणे बदलू शकते. विविध भाषा, धर्म, जाती, परंपरा आणि संस्कृती यांचा अफाट पट मिरवणारा हा देश विविधतेत एकतेचे जिवंत उदाहरण आहे. जवान सीमेवर उभा असतो, शेतकरी मातीतून सोनं पिकवतो, शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत भविष्य घडवतो आणि शिक्षक वर्गखोलीत उद्याच्या भारताची पायाभरणी करतो. संकटाच्या काळात मदतीसाठी धावणारे हात, रक्तदानासाठी पुढे सरसावणारे तरुण, गरजूंच्या शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते आणि निःस्वार्थपणे समाजसेवा करणारे नागरिक हा सुद्धा भारतच आहे!
पण प्रश्न असा आहे की, भारताने प्रगती केली मग भारतीयांच्या मानसिकतेनेही तितकीच प्रगती केली आहे का ? याचे उत्तर शोधणे काळाची गरज बनली आहे. हा भारत आहे, जिथे स्त्री अंतराळात झेप घेते, क्रीडांगणावर पदके जिंकते, प्रशासनात जबाबदारी सांभाळते आणि उद्योगविश्वात नवे आदर्श निर्माण करते. पण दुसरीकडे अवघ्या तीन वर्षाच्या मुलीला वासनांध गिधाडे अक्षरशः गिळंकृत करतात. एवढेच नाही तर मुलींच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित होतात, स्त्रीच्या स्वातंत्र्यावर अनावश्यक बंधने घातली जातात आणि स्त्रीसुरक्षेचा प्रश्न समाजासमोर आव्हान म्हणून उभा राहतो. एका हाताने स्त्रीशक्तीचा गौरव करायचा आणि दुसऱ्या हाताने तिच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे करायचे हा विरोधाभास संपणार तरी कधी?
हा भारत आहे, जिथे लोकशाही आपल्याला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देते; पण मतभिन्नता स्वीकारण्याची सहनशीलता मात्र जपावी लागते. समाजमाध्यमांवर ज्ञानाचा महासागर खुला आहे, पण त्याच ठिकाणी अफवा, अपमानास्पद भाषा आणि अपुऱ्या माहितीवर आधारित निष्कर्षांचाही बाजार भरतो. सत्य तपासण्याआधी संदेश पुढे पाठवला जातो आणि विचार करण्याआधी प्रतिक्रिया दिली जाते. माहितीच्या वेगाने विवेकाची गती मागे पडली, तर तंत्रज्ञान प्रगत होऊनही समाजाची विचारशक्ती प्रगल्भ होईलच असे नाही.
हा भारत आहे, जिथे प्रामाणिकपणाची शिकवण दिली जाते; पण काही व्यवहारांत लाच, वशिलेबाजी, करचुकवेगिरी आणि नियमांना बगल देण्याचे प्रकार दिसतात. आपले काम नियमांनुसार झाले नाही की, व्यवस्था वाईट वाटते; पण नियमबाह्य मार्गाने आपले काम झाले, तर त्याच व्यवस्थेतील दोष सोयीस्करपणे विसरले जातात. भ्रष्टाचाराविरुद्ध भाषणे करणाऱ्या समाजाने स्वतःच्या छोट्या-छोट्या गैरप्रकारांचेही समर्थन करणे थांबवले, तरच प्रामाणिकपणाला खरा सामाजिक आधार मिळेल.
तरीही भारताचे चित्र केवळ काळ्या रंगात रंगवणे अन्यायकारक ठरेल. कारण या देशात चुका आहेत, पण त्या सुधारण्याची क्षमता देखील आहे. समस्या आहेत, पण त्यांच्याशी लढणारे हातही आहेत. अन्याय आहे, पण न्यायासाठी उभे राहणारे आवाजही आहेत. अस्वच्छता आहे, पण स्वच्छतेसाठी स्वतः झाडू उचलणारे नागरिकही आहेत. अंधश्रद्धा आहे, पण विवेकाची ज्योत तेवत ठेवणारे विचारवंतही आहेत. निराशा आहे, पण अपयशातून उभे राहून नवे विश्व घडवणारी तरुणाईही आहे. भारताला महासत्ता बनवण्यासाठी केवळ मोठे प्रकल्प नकोत मोठे विचारही हवेत. आधुनिक शहरे हवीत पण आधुनिक मानसिकताही हवी. कायदे हवेत पण कायद्याचा आदर करणारे नागरिकही हवेत. स्वातंत्र्य हवे पण त्या स्वातंत्र्याला जबाबदारीची जोडही हवी.
आज ‘शनिवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय राहुल सरांनी हा भारत आहे हा खूप सुंदर विषय दिला आपण सर्वांनी खूप छान पद्धतीने विषयाला न्याय दिला तेव्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समूह प्रशासन आणि आदरणीय राहुल सर यांच्याप्रती आभारीय शब्दसुमनांची मुक्त उधळण…!!
प्रशांत दत्तात्रेय ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
मुख्य परीक्षक/लेखक/समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



