इंद्रपुरी ते अमरावती: एक प्रवास
गजवंती विघ्ने ता. बडनेरा, जि. अमरावती

इंद्रपुरी ते अमरावती: एक प्रवास
अमरावती म्हणजे पूर्वीची औदुंबरावती, पुढे पुढे ती उमरावती झाली. गावाला, शहराला तिथल्या भौगोलिक परिस्थितीवरून नाव देण्याची पुरातन पद्धती आहे. गावाच्या वेशीवर, गावात जागोजागी उंबराची झाडे असतील म्हणूनही हे नाव पडले असावे. पुढे पुढे सामाजिक, राजकीय संक्रमणातून ते अमरावती झाले. या शहराची विशेषता म्हणजे या शहराला पाच गेट आहेत अंबागेट, नागपुरी गेट, जवाहरगेट, महाजन गेट व खोलापुरीगेट प्रत्येक गटाचा आपला असा इतिहास आहे वैशिष्ट्य आहे. या शहराचं हृदय स्थान म्हणजे राजकमल चौक. राजकमल चौकातच राजकमल टॉकीजची स्थापना व्ही. शांताराम यांनी केली होती, म्हणून राजकमल चौक हे नाव पडले. तिथून जवळच अंबादेवी रोड, गांधी चौक आणि पुढे इतवारा बाजार शहरातला अगदी जुना आणि प्रसिद्ध असा इतवारा बाजार. पुढे वलगाव रोड नागपुरी गेट खोलापुरी गेटचा भाग. चित्रा चौकापासून पुढे कॉटन मार्केट, पुढे पंचवटी, घाडगे नगर, शेगाव रोड, कठोरा नाका, पुढे पोटे कॉलेज असा विस्तार.
राजकमल चौकाजवळच रेल्वे स्टेशन परिसर, इर्वीन चौक, राजापेठ, साईनगर इ. आज अमरावतीचा विस्तार बऱ्यापैकी झाला. अमरावतीला अगदी खेटूनच बडनेरा शहर आहे .पूर्वी बडनेरा हे नगर परिषद असणारं लाख भर लोकसंख्येचे गाव, आता अमरावतीचे उपनगर आहे. अमरावती -बडनेराची लोकसंख्या आता सात लाखापर्यंत पोहोचली आहे. बडनेराची ओळख म्हणजे बडनेरा रेल्वे जंक्शन अशी आहे. राजकमल चौक येथून अवघ्या दहा किलोमीटरवर असल्यामुळे बडनेरा भाग पूर्वी उपेक्षित होता. सर्व कष्टकरी, कामकरी, शेतकरी सर्वांना कामासाठी अमरावतीलाच जावे लागे. म्हणून बडनेरकरांना त्याचे विशेष कधी वाटलेच नाही. कारण आमची अमरावती पूर्वी पासूनच आम्ही मानली.
1983 ला अमरावती -बडनेरा महानगरपालिका झाले. भारतात ‘खाजगी जकात’असलेली महानगरपालिका म्हणून ओळख. आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हे अंबादेवी भागातच वसलेले आहे. 1914 साली अंबादास पंत वैद्य आणि अनंतपंत वैद्य या बंधूंनी याची स्थापना केली आहे. सध्या प्रभाकरराव वैद्य या मंडळाचे प्रधान सचिव आहेत. शहीद राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांनी येथे वास्तव्य केले. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक थोर नेत्यांनी या मंडळाला भेट दिली.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबादेवी परिसरामधूनच रुक्मिणीने श्रीकृष्णा सोबत पलायन केले होते. रुक्मिणी राजा भीष्मकाची कन्या होती, रुक्मी तिचा भाऊ. श्रीकृष्णाच्या कथा पराक्रम ऐकून रुक्मिणीला श्रीकृष्णाशी विवाह करायचा होता, पण रुक्मीला तिचे लग्न शिशुपालाशी लावायचे होते, म्हणून मग तिने श्रीकृष्णाला पत्राद्वारे विनंती करून बोलावले अशाप्रकारे मग त्याने तिला द्वारकेत नेले. अमरावतीचं सांस्कृतिक, सामाजिक वैभव म्हणजे व्ही एम व्ही, विदर्भ महाविद्यालय. या महाविद्यालयात अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडणीचे विचारवंत घडले. मोठे मोठे साहित्यिक येथे शिकले, प्रसिद्ध कवी, गझलकार सुरेश भट, मधुकर केचे इथलेच. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज हे आधुनिक विज्ञानवादी संत इथलेच. अमरावती विद्यापीठाचे नावही संत गाडगेबाबा असे आहे .
1729 मध्ये संताजी भोसले यांनी हे गाव विकत घेऊन वसवले. पुढे ते नागपूरच्या भोसलेंकडे गेले. नंतर निजाम आणि त्यानंतर ब्रिटिशांनी वऱ्हाड प्रांतात विलीन केले, मूळ अमरावतीवर हिंदीचा प्रभाव तो याचमुळे आहे. 30 – 40 वर्षांपूर्वी ग्रामीण संस्कृती असलेली अमरावती आज झपाट्याने झगमगतेय, पुण्यानंतर विद्येचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. शहरात नांदगाव पेठ जवळ बिझी लँड, ड्रीमलँड सिटी लँड असे कापडाचे मोठे हबच वसले आहे. कापड खरेदीसाठी दूरवरून लोक येतात. अलीकडेच झालेल्या प्रदूषण सर्वेक्षणात अमरावती हे सर्वात कमी प्रदूषण असलेले शहर आहे. अमरावतीची ‘आबोहवा’ उच्च दर्जाची आहे. हिरवीगार अमरावती प्रत्येकाच्या अभिमानाचा विषय आहे. जवळच चिखलदरा हे पर्यटन केंद्र असल्यामुळे तेथे असलेली पर्वतराजी, जैवविविधता, अचलपूर परत वाड्याला मिळालेली पावसाची देणगी सुपीक झालेला चांदूरबाजार परिसर, वर्धा -अमरावती जिल्ह्याला विभागणारी वर्धा माय, त्यामुळे आलेली सुपीकता जलसिंचनाची सोय, प्रसिद्ध अप्पर वर्धाधरण ही सगळी घटकं अमरावतीला वैभव प्रदान करतात, तर अशीही अंबा नगरी, इंद्रपुरी अमरावती !
गजवंती विघ्ने
ता. बडनेरा, जि. अमरावती
===========



