नावात काय आहे?
गजवंती सुभाष विघ्ने बडनेरा, जि.अमरावती

नावात काय आहे?
व्यक्तीचे नाव ही त्याला मिळालेली ओळख आहे. ती त्याला जन्माबरोबरच मिळालेली असते. घरातील आप्तेष्ट त्याचे नाव ठेवतात पुढे तो त्याच नावाने ओळखला जातो, पुढे येतो सहजपणे आपले नाव स्वीकारून अभिमानाने सांगत असतो माझे नाव हे हे आहे, मी अमुक अमुकांचा मुलगा /मुलगी आहे वगैरे वगैरे. आताचे आई वडील आपल्या पाल्याचे नाव खूप निवडून, अर्थ पाहून व नावातली नवीनता पाहून ठेवतात. पूर्वी मात्र असं नव्हतं, आता माझेच नाव पहा ना ‘गजवंती’कुणी म्हणेल वेगळेच नाव आहे, तर कुणी म्हणेल असंही नाव असते का? आजपर्यंत तरी मी असं आणि हे नाव कोणीच ठेवलेलं पाहिलं नाही, आहे ना जरा विचित्रच !
माझ्याही नावाचा एक इतिहास आहे. आमचं कुटुंब एक गरीब अज्ञानी असं, म्हणजे आम्ही भावंडं सगळी लहान , घरात मी पाचवी, आई वडील मजुरीला जात लेकरांकडे विशेष लक्ष नसे. अज्ञान व दारिद्र्यामुळे घरातली दोन भावंडं आधीच मरण पावलेली, त्यामुळे शेजारच्या ‘अम्मा ‘ने मला देवाच्या ठाण्यात नेले. अम्माच माझा सांभाळ करायची तिला मुलं बाळं नसल्यामुळे मी अम्माकडेच राहायचे. इथं माझं नाव सत्तार नावाच्या सज्जन व्यक्तीने ठेवले होते. मी जसजशी मोठी झाले, तसं तसं मला याच मामांनी आपलं नाव ठेवलं हे मला समजलं, मग काय, मामा मला जेव्हा दिसले की, मी त्यांना म्हणायचे, “क्या मामा मेरा नाम आपने ऐसा क्यो रख दिया ? जरा जास्त समजल्यानंतर मी त्यांना विचारायचे पर क्यू रखा? ते मला म्हणायचे ” बडी का नाम शेवंती छोटी का नाम गजवंती ” प्रत्येक वेळी दिसल्यावर ते एवढचं म्हणायचे, बेटा तुम्हारा नाम अच्छा है |माझ्याजवळ मात्र या प्रश्नाचं उत्तर नसायचं; पण माझं नाव मला अजिबात आवडायचं नाही.
एक दिवस हे नाव पुराण आमच्या मराठीच्या तापे मॅडम यांना समजलं, मी त्यांची आवडती विद्यार्थिनी. मलाही त्या खूपच आवडायच्या, मला त्या म्हणाल्या, “प्रत्येक नावाला अर्थ असतो ग, तुझ्याही नावाला आहे त्यात काय एवढं”? मग मॅडमने मला माझ्या नावाचा अर्थ सांगितला ऐकून थोडे बरे वाटले. मी शॉपिंगला किंवा कुठे जायची तेव्हा नाव सांगायचं काम पडलं की, मी माझ्या मैत्रिणीचे नाव घेऊन बाबांचे नावापुढे आडनाव लावायची, जसे संगीता दशरथ पांडे, कांचन दशरथ पांडे. मैत्रिणींना काही वाटायचं नाही त्यांना हे ऐकायची सवयच होती.
एक तर माझे नाव माया, मीना, सीमा, ममता, समता, कविता, अनिता, सुनीता यापैकी काहीच नव्हते. सभोवताली पाहिले, की या नावाच्या बऱ्याच व्यक्ती दिसायच्या म्हणून मला आपलं नाव कसंतरी वाटायचं. नाव जरा विशेष (चमत्कारिक) असल्यामुळे सगळे मला नाव घेऊनच बोलवायचे. माझ्या नावाचा अर्थ गज+ अवंती, गजाच्या पावलाने हळूहळू चालणारी अशी ती, किंवा गजलक्ष्मी पण पहिला अर्थ लक्षात घेतला तर मी नावाच्या अगदी उलट होते, म्हणजे मी खूप फास्ट चालायचे धावण्याच्या शर्यतीत पुढेच राहायचे.
मला वाटतं बहुतेक व्यक्ती माझ्या आजपर्यंतच्या निरीक्षणानुसार आपल्या नावाप्रमाणे नसतातच मुळी, उदा. नाव मीनाक्षी, सुनयना , डोळे रेखीव मोठे सुंदरच असतील याची काही शाश्वती नसते. नाव संतोष ती व्यक्ती समाधानीच असेल असे काही नाही, नाव नम्रता ती नावाप्रमाणे नसणारच, तुम्हाला हे ऐकून जरा विचित्रच वाटेल पण तुम्ही पण अनुभवा खरंच व्यक्ती अशा असतात का हो ? ज्या थोड्याफार असतात किंवा अगदीच आदर्श असतात अशी लोकं जगामध्ये फारच कमी पाहायला मिळतात. मग आपणही म्हणतो नावाप्रमाणेच हा /ही आहे. हो तरीपण आई वडील, जवळचे नातेवाईक आपले नाव फारच ‘प्रेमाने’ ठेवतात.
माझ्या या नावाने एक मात्र मला शिकवले, की आपण जसं आहोत तसं स्वतःला स्वीकारलं पाहिजे, स्वतःचा आत्मसन्मान राखला पाहिजे, आपणच जर स्वाभिमानाने वागलो नाही , स्वतःवर प्रेम केले नाही, स्वतःवर विश्वास दाखवला नाही तर कोणतेही काम आपण आत्मविश्वासाने करू शकत नाही म्हणून आपणच स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. (पण स्वतःला पारखून, आत्मभान राखून, फाजील आत्मविश्वास नव्हे)
शेवटी जाता जाता नावात काय आहे? हा प्रश्न आहेच नावात बरंच काही आहे. म. गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सुभाष बाबू, कलाम साहेब अशी किती तरी थोर माणसं आहेत ज्यांची नावं घेतल्याबरोबरच त्यांचं चरित्र, कार्य आपल्याला आठवते, थोर लेखक कवी, संत ही नावं घेतल्यानंतरच त्यांच्या कार्याचा धांडोळा आपण घेतच असतो की नाही? आपण सामान्य ही आपल्या एखाद्या चांगल्या कृतीने/गुणाने आपल्या परिचयातल्या लोकांमध्ये ओळखले जातोच ना ?(काही वाक्यांमुळे, काही शब्दांमुळे, कोणाचे मन दुखावले असल्यास अजिबात मनावर घ्यायचे नाही, हे पूर्णतः माझे मत आहे, तुम्ही सहमतच असाल असे नाही)
गजवंती सुभाष विघ्ने
बडनेरा, जि.अमरावती
========



