Breaking
अमरावतीआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

अवतीभोवती

गजवंती सुभाष विघ्ने बडनेरा, जि.अमरावती

0 6 2 9 1 5

अवतीभोवती

एप्रिलची भर दुपार, पोर्चमध्ये बसली असताना, मी घरी लावलेल्या छोट्या छोट्या रोपांकडे कुतूहलाने, कौतुकाने बघत होती. तप्त उन्हाने मनी प्लांट जळत होता, बाजूलाच छोटासा मोगरा फुलत होता. गुलाब आपला नेहमीप्रमाणे पण, थोडा कोमेजलेलाच. माझं लक्ष एप्रिल/मे फ्लावरकडे गेलं. त्याच्या दांड्या झरझर वर येत होत्या. चार-पाच दिवसात दांडी वर जाऊन त्याला कळी धरत होती आणि मग केशरी रंगाचे झुपके तयार होत होते. प्रखर उन्हातही नजरेला जणू काही तजेला देत होते.

एवढ्या उन्हात कशी बरं काही रोपं, काही झाडं फुलतात याचं मला भारीच कौतुक वाटतं..!! निसर्गाची ही जादुगरी खरंच कळत नाही. काही झाडं, रोपं बारोमास फुलतात जसे की मोठा मोगरा (जास्त सुवास नसलेला), सदाफुली, गुलाब, चाफा, प्राजक्त इ. पण काही फुलं आपल्या गुणधर्मानुसार काही खास ऋतूतच फुलतात आणि माणसाला जगण्याचा आनंद देतात. उन्हाळ्यात आंबा, चिंच ऐन बहरात असतात खरबूज, टरबूज जोडीला. हिवाळ्यात तर फळ भाज्यांची लय लूटच असते. माणसाला सुदृढ बनवणारे केळी चिकू, सिताफळ ,पेरू मुबलक प्रमाणात बाजारात दिसतात. हल्ली पपई ,चिकू ,अननस, केळी, पेरू अधून मधून दृष्टीस पडत राहतात. पण भाज्यांचा फळांचा फुलांचा नैसर्गिक हंगाम हा मनाला खराखुरा आनंद देत असतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वनस्पतीची दिसणारी टवटवीत पानं, फुलं, फळं यांची रूपं नजर लागावी अशीच असतात, मानवी मनाला प्रसन्न करणारे असतात.

माणसांनं निसर्गावर कुरघोडी करून अनेक गोष्टीत बदल केले, तसे फुल झाडात फळझाडात ही बदल केले. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांना नवीन रूप नवीन साज चढविला. मग जिथे जिथे ती रूजतील, फळतील तिथे तिथे त्यांना उभे केले. अर्थात सृष्टीचे हे एक नवीन रूप मानवाने सृष्टीला बहाल केले. पण निसर्गतः उठणारी रानफुले , तृणफुले यांचा साज शृंगार अवर्णनीय असतो. ती नक्षी कलाकारी ही माणसाच्या हातात नसतेच मुळी. इवली इवली फुलं एक दिवस फुलतात आपले सौंदर्य या सृष्टीला बहाल करतात. आपल्याला मात्र त्याचे मोल नसते.

खरंच या छोट्याशा आयुष्यात या सृष्टीतली सारी वनराजी, हिरवाई माणसाला आनंद देऊन जातात. माणूस मात्र नफ्या- तोट्याचा व्यवहार बघतो. जेवढा मनुष्य प्रगत होत आहे, तेवढा तो स्वार्थी, मतलबी फक्त स्व प्रगती पाहणारा होत आहे. आपण का नाही प्राजक्ताप्रमाणे सकाळी सकाळी अंगणभर पसरून माणसाला प्रसन्न करीत नाही? चाफ्याप्रमाणे फुलत नाही ? रातराणी, प्राजक्ता व चाफा रात्रीही आपला सुगंध देऊन माणसाला प्रसन्न करीत असतो. भर उन्हात मोगरा सुगंध देऊन माणसाला शितलता प्रधान करतो. गुलाब त्याच्या मंद मंद सुवासाने आजूबाजूचा परिसर दरवळून टाकतो. आपल्या दिमाखदार अस्तित्वाने सगळ्यांना खिळवून टाकतो.

या सृष्टीतल्या फुलझाडं, प्राणीमात्रां (काही हिस्त्र प्राण घातक इजा करणारे) कडून मानव काही बोध घेत नाही का? सृष्टीतल्या या सुंदर जीवनाकडे पाहून त्याला तसं व्हावं असं वाटत नाही का ? खरंच आपल्याला मिळालेल्या जीवनमानानुसार आपणही तसे वागलो तर ही सृष्टी खरंच नितांत सुंदर थोडक्यात सत्यम शिवम सुंदरम होईल.

“पिवळा चाफा करीत नाही शेवंतीचा हेवा.
जास्वंदीच्या रंगछटेची गुलाब करतो वाहवा.
उंच नारळीलाही गवताचा अभिमान.
छान छान छान आमचा बाग किती छान.
फळेही छान, फुलेही छान पक्षी किती छान.”

गजवंती सुभाष विघ्ने
बडनेरा, जि.अमरावती
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 1 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे