Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसंपादकीयसाहित्यगंध

“आम्ही मार्गस्थ.. स्वप्नांच्या शोधासाठी”; स्वाती मराडे

गुरूवारीय "चित्र चारोळी स्पर्धे'चे काव्यपरीक्षण

0 6 2 9 0 4

“आम्ही मार्गस्थ.. स्वप्नांच्या शोधासाठी”; स्वाती मराडे

गुरूवारीय “चित्र चारोळी स्पर्धे’चे काव्यपरीक्षण

ओढ्यावर असणारा पूल ओलांडून दूर क्षितिजापर्यंत जाणारा रस्ता. पुलाजवळच लालचुटूक उमललेली फुले अंगभर मिरविणारा गुलमोहर..!! काही रस्त्यावर गळालेली तर काही दिमाखात फांदीवर झुलणारी फुले. निसर्गरम्य वाट असली, तरी कुठे खाचखळगे तर कुठे अगदी स्वच्छ रस्ता. जंगलातून, काट्याकुट्यातून पलीकडे जाताना क्षितीज नजरेसमोर दिसते आहे… अहं..!! तो तर केवळ आभास तरीही मनास मोहविणारे ते क्षितीज घेऊन जाते पावलांना तिथपर्यंत. त्यासाठीच होतो आम्ही मार्गस्थ. ते क्षितीज आहे अनेकविध स्वप्नांचे. प्रत्येकजण कुठे ना कुठे जात आहे. कोणी शिकण्यासाठी, कोणी जगण्यासाठी, कोणी स्वप्नांच्या शोधासाठी चालले आहे. रस्ता कधी खडबडीत, कधी मऊ, कधी उन्हाचा तर कधी सावलीचा असतो, अगदी आपल्या आयुष्यासारखा.

जन्म व मरण या दोघांच्या मध्ये असणारं आयुष्य. काळासोबत मानवी जीवनाचा अविरत प्रवास सुरू होतो. भूत व भविष्य हे दोन‌ दुवे जोडणारा तो वर्तमानाचा पूल. वाटेत अडथळे तर येतातच, पण अडथळ्यांना पायाखाली तुडवून पुढे जायचे असते हेच सांगतो आहे. मधोमध धुळीने माखलेला पांढरट रस्ता आणि दूरवर पसरलेले माळरान… हा फक्त रस्ता नाही, तर हे जीवनाचे प्रतीक आहे. आपण सगळेच “आम्ही मार्गस्थ” आहोत. या वाटेवर गुलमोहोरासारखी माणसे भेटतात; जी क्षणभर आपल्या आयुष्यात रंग भरतात, सावली देतात आणि मग मागे राहून जातात. तर कधी कधी या मोहाने पुढची वाटचाल थांबते नि गुरफटून जातो माणूस मोहमायेच्या दुनियेत. कुणाच्या नशिबी अशी सावली येते तर कुणाच्या वाट्याला त्या तोडलेल्या झाडासारखे पोरकेपण.

सावलीच हरवते तेव्हा दु:खाचा चटका हा बसणारच. अशावेळी पहावा तो गुलमोहर. आपल्या फुलण्यातून तो किती छान संदेश देतो. उन्हाळ्याची चाहूल लागली की, गुलमोहोर बहरतो. दु:खालाही तो वाकुल्या दाखवतो. या चित्रातही दोन गुलमोहराचे वृक्ष आपल्या लाल-केशरी फुलांनी रस्त्यावर कमान धरून उभे आहेत, जणू येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना ते विचारताहेत – “कुठे निघालात? थोडा विसावा घ्याल का?” रस्त्यावर पडलेली फुले सांगतात की सौंदर्य हे कायम नसते, ते क्षणभंगुर असते. पण त्या क्षणातही किती आनंद देऊन जाते! आजचा हा उन्हाचा रस्ता उद्या पावसात चिंब भिजेल, परवा हिवाळ्यात धुक्याने झाकून जाईल, पण मार्गस्थांचा प्रवास मात्र थांबणार नाही. हाच तर जीवनाचा खरा मंत्र आहे, थांबायचे नाही, चालत राहायचे, कारण आम्ही मार्गस्थ आहोत!

आज ‘गुरुवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्र ‘आम्ही मार्गस्थ’ हे शीर्षक घेऊन. वाटेवरील गुलमोहर, पूल, वनराई व क्षितीज यांचा मागोवा घेत जीवनाशी सांगड घालत केलेल्या रचना मनोहारी. निसर्गाशी तादात्म्य पावत गुंफलेल्या चारोळी रचना अलगद जीवन प्रवास टिपतात तेव्हा मनास आल्हादपणाची जाणीव होते. काही रचना अशाच आशयघन व मनस्पर्शी. आपणा सर्वांचे वैविध्यपूर्णतेसाठी हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/ लेखिका
©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे