“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” अभियानास प्रारंभ
हिंगणा शहर प्रतिनिधी:गजानन ढाकुलकर
“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” अभियानास प्रारंभ
हिंगणा महसूल विभागाचा पुढाकार
हिंगणा शहर प्रतिनिधी:गजानन ढाकुलकर
नागपूर/ हिंगणा बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: ( दि ५ मार्च) जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” हे अभियान सुरू करण्यात येत आहे. या अभियानाचा पहिला टप्पा ७ मार्च २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या शिबिरांमध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे. हिंगणा तालुक्यातील अडेगाव, वडधामना, टाकळघाट, गुमगाव, कन्होलीबारा, वानाडोंगरी आणि हिंगणा या महसूल मंडळांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या अभियानाबाबत माहिती देण्यासाठी ५ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालय, हिंगणा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसिलदारांनी सांगितले की, अभियानाची सुरुवात तालुक्यातील शेवटच्या टोकावरील अडेगाव येथून होणार असून नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या शिबिरांमध्ये सातबारा दुरुस्ती, वर्ग २ मधून वर्ग १ रूपांतरण, उत्पन्न व जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, निराधार योजना, आरोग्य सेवा तसेच वाहतूक परवाना यांसारख्या विविध सेवांसाठी संबंधित विभागांचा सहभाग राहणार आहे.
दरम्यान पत्रकार परिषदेत ज्येष्ठ पत्रकारांनी वानाडोंगरी येथील पीडित महिला सिंधू नरुले यांच्यावर हिंगणा तालुक्यात बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटी कडून झालेल्या अन्यायाबाबत चौकशी करून बेकायदेशीर लेआउट प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. यावर तहसीलदारांनी या प्रकरणाची माहिती तात्काळ गोळा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नायब तहसीलदार नितीन गोहने उपस्थित होते.



