आईच्या कुशल हातांची कहाणी
अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर

आईच्या कुशल हातांची कहाणी
काही वस्तू या केवळ वस्तू नसतात, त्या आपल्या आयुष्यातील आठवणींचे कप्पे असतात. काळाच्या ओघात त्यांचे रंग फिके होतात, धागे जीर्ण होतात; पण त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी मात्र दिवसेंदिवस अधिक गडद होत जातात. अशाच काही वस्तू आजही आमच्या घरात आणि मनात जीवापाड जपलेल्या आहेत. कारण त्या वस्तूंमध्ये सामावलेली आहे. माझ्या आईच्या कुशल हातांची जादू, तिची कल्पकता आणि संसारासाठी झटणाऱ्या तिच्या कष्टाळू मनाची कहाणी!
मला आठवतं… मी कदाचित सातवी-आठवीच्या वर्गात असेन. आमच्या घराच्या दाराला एक सुंदर पडदा होता. ज्युटच्या कापडावर रेशमी दोऱ्यांनी केलेली नाजूक कलाकुसर! त्यावर इंग्रजीत विणलेला ‘WELCOME’ हा शब्द, त्याखाली मोठी गणपतीची प्रतिमा, दोन्ही बाजूंना समया आणि खाली छोटासा उंदीर. किती बारकाईने आणि कल्पकतेने आईने हे सारे साकारले होते! आज त्या पडद्याकडे पाहिलं की, आश्चर्य वाटतं आणि आईच्या कलेपुढे मन नकळत नतमस्तक होतं. माझी आई केवळ सातवीपर्यंत शिकलेली; पण तिच्या हातात जणू कलेची अद्भुत जादूच होती. कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता, केवळ निरीक्षण, कल्पकता आणि काहीतरी नवीन करण्याच्या ध्यासातून तिने ही कला आत्मसात केली होती. एखादी वस्तू तिच्या नजरेस पडली की ती ती बारकाईने न्याहाळायची. त्यातून काहीतरी वेगळं निर्माण करण्याचा विचार तिच्या मनात आकार घ्यायचा आणि मग तिच्या कुशल हातांतून त्याहूनही सुंदर वस्तू जन्माला यायच्या.
एकदा शेजारच्या काकूंनी प्लास्टिक वायरचा एक फ्लॉवरपॉट आणला. आईने तो पाहिला, त्याची रचना समजून घेतली आणि स्वतःच्या कल्पकतेची भर घालून तिने तसाच, पण वेगळ्या ढंगाचा सुंदर फ्लॉवरपॉट तयार केला. तिच्या कलेची चर्चा होऊ लागली आणि शेजारपाजारातून तिच्याकडे अशा वस्तूंच्या मागण्या येऊ लागल्या. आमची परिस्थिती बेताचीच होती. आम्ही सात भावंडे, आई-वडील आणि आजी-आजोबा असा मोठा परिवार. एवढ्या मोठ्या संसाराची जबाबदारी सांभाळताना आईला संसाराला हातभार लावायचा होता. त्यासाठी तिने परिस्थितीपुढे हात टेकले नाहीत; उलट आपल्या कलेलाच तिने आधार बनवलं.
त्या काळात दुधाच्या पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरात येऊ लागल्या होत्या. इतरांसाठी त्या टाकाऊ; पण आईच्या कल्पक नजरेला त्यातही सौंदर्य दिसलं. त्या स्वच्छ करून त्यापासून पारिजातकाच्या फुलांसारखे सुंदर हार तयार करणे, क्रोशाच्या कापडावर आकर्षक बेडशीट विणणे, पडदे आणि मोरांच्या आकृत्यांनी सजलेली तोरणे तयार करणे, त्यांना नाजूक गोंडे लावणे, तिच्या हातातून सतत काही ना काही आकार घेत असे.
एवढंच नाही, तर मुलींसाठी पेटीकोट आणि फ्रॉकही ती हाताने शिवायची. एखादा जुना कपडा उसवायचा, त्यावर दुसरा कपडा ठेवून कटींग करायचं आणि मग सुई-दोऱ्याने हातानेच शिवायचं! साध्या साध्या साधनांतून ती आपल्या संसारासाठी उपयोगी आणि सुंदर वस्तू तयार करायची. हळूहळू हा केवळ छंद राहिला नाही. आईने आपल्या कलाकृती विक्रीसाठी तयार करायला सुरुवात केली. मोठी बाजारपेठ तिला कधी मिळाली नाही; पण घरगुती गिऱ्हाईकांची मात्र तिला भरभरून दाद मिळाली. कर्जत येथील कन्या शाळा आणि महात्मा गांधी विद्यालयातील माझ्या मैत्रिणी, काही शिक्षिका आमच्या घरी येत. त्यांनी आईच्या हातांनी तयार केलेल्या वस्तू पाहिल्या आणि त्या अक्षरशः भारावून गेल्या. शाळेतील थोर नेते आणि सरस्वतीच्या प्रतिमांसाठी, तसेच कार्यक्रमांच्या वेळी टेबल सजवण्यासाठी तिच्या हातचे हार, फ्लॉवरपॉट आणि इतर सजावटीच्या वस्तूंच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. अनेक शिक्षकांनी आपल्या घरासाठीही तिच्या कलाकृती आवर्जून घेतल्या.
दाराची लोकरीची तोरणे, पूजेच्या ताटावर ठेवायचे नाजूक रुमाल, छोट्या बास्केट, फ्लॉवरपॉट, हार… कितीतरी वस्तूंना तिच्या कुशल हातांचा स्पर्श लाभला. तेव्हा आम्ही लहान होतो. तिच्या या कलेचं महत्त्व कदाचित तेव्हा जाणवलं नाही. ती सहज घडणारी गोष्ट वाटायची. पण आज मागे वळून पाहताना मन भरून येतं. कोणतेही प्रशिक्षण नाही, मोठी साधनं नाहीत; तरीही कल्पकता, जिद्द आणि कष्ट यांच्या बळावर आईने स्वतःचं एक सुंदर कलाविश्व उभं केलं. काळाच्या ओघात काही वस्तू खराब झाल्या, काही नष्टही झाल्या. मात्र पंचेचाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या काही वस्तू आम्ही आजही जपून ठेवल्या आहेत. आमच्या भावंडांच्या घरात त्या अभिमानाने स्थान मिळवून आहेत. आमच्या शेजारी राहणाऱ्या वडिलांच्या जिव्हाळ्याच्या मित्रांच्या घरीदेखील आईच्या हातांनी तयार केलेल्या काही वस्तू आजही जपलेल्या आहेत.
आणि गंमत म्हणजे… आज वयाच्या ८५ व्या वर्षीही आईच्या हातातील सर्जनशीलता थांबलेली नाही. तिच्या अक्षरांतून, तिच्या भक्तीतून आणि तिच्या चिकाटीतून तिने हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली आहे. तिच्या हातातील सुई-दोऱ्यापासून सुरू झालेला हा सर्जनशील प्रवास आज ज्ञानेश्वरीच्या अक्षरांपर्यंत येऊन पोहोचला आहे, हीच तिच्या जिद्दीची आणि अंतःप्रेरणेची खरी ओळख आहे. आज या जुन्या वस्तू हातात घेतल्या की, त्या निर्जीव वाटत नाहीत. त्यातून आईच्या हातांचा स्पर्श जाणवतो… तिची धडपड दिसते… संसाराला हातभार लावण्याची तिची तळमळ जाणवते आणि तिच्या कल्पक मनाची ओळख पुन्हा नव्याने होते. म्हणूनच त्या आमच्यासाठी केवळ जुन्या वस्तू नाहीत. त्या आहेत आईच्या कष्टांची साक्ष, तिच्या कलागुणांची ओळख आणि आमच्या बालपणीच्या आठवणींचा अमूल्य ठेवा.!! आडगळ म्हणून फेकून न देता, आईच्या आठवणींचा सुगंध जपावा तसे आम्ही त्या आजही मनापासून… जीवापाड जपल्या आहेत.
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर



