0
4
8
2
9
3
हिरवा शृंगार
हिरव्या तरुखाली
झोपाळा बांधावा
हिरव्या वेलींनी
त्याला सजवावा
बसुनी त्यावर
मी घ्यावा झुला…
हिरवी कैरी
हिरव्या चिंचा
द्या ग आणुनी
रानमेवा ताजा..
नेसुनी शालू
भरजरी हिरवा
हिरवागार चुडा
हाती मिरवावा
हिरवाच चाफा
नि माळावा मारवा..
असा हिरवा शृंगार
का गं करू वाटे
मुखावर लाली
का गं माझ्या दाटे..
जावे नदीकाठी
सोडावे जळी पाय
पाहुनी पाखरे
मन आकाशी जाय
अनामिक हुरहूर
कळेना ते काय..?
आषाढ, श्रावणी
चहुकडे हिरवळे
गर्भार धरणी
साजिरे सोहळे
लागले गं सखी
तुजलाही डोहाळे
हिरवा शृंगार
तुझाही करुया रे..!
स्वाती मराडे-आटोळे,
इंदापूर पुणे
========
0
4
8
2
9
3



