Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

गुरु महात्म्य: अनिता व्यवहारे

अनिताअनिल व्यवहारे ता श्रीरामपूर जि अहमदनगर

0 4 8 2 9 0

गुरु महात्म्य

आत्मस्वरूप सर्व ठायी भरले, जगात दुसरे काही न उरले
असे ज्याचे चित्र रंगले, त्यासीच गुरु म्हणून कथिले..’

आज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. सर्व शिष्यगणांच्या मनात आनंदाचे भरते आणणारा हा दिवस. या दिवशी आपण आपल्या गुरूंविषयी आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस. अर्थातच आजच्याच दिवशी आदर भाव दाखवून इतर दिवशी अनादर असावा का? तर नाही..! सदैव आपल्या अंतर्मनात आपल्या गुरूंविषयी प्रेमभाव असायला पाहिजे हे या दिवसाचे मुख्य कारण असावे. मी जेव्हा माझ्या शाळेत मुलांना या गुरुपौर्णिमेविषयी माहिती सांगत होते त्यावेळी मला एका मुलीने प्रश्न विचारला. ‘मॅडम पौर्णिमेलाच काय म्हणून गुरुपौर्णिमा आली’? अमावस्येला का येऊ शकत नाही? तेव्हा मी तिच्या शंकेचे निरसन केलं. तिला म्हटलं, “बाळ, पौर्णिमा ही शुक्ल पक्षात येते. प्रतिपदेपासून चंद्राचा आकार कलेकलेने वाढत जातो व पौर्णिमेस पूर्णपणे विकसित होतो. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जीवनात सतत उन्नती होत जावी, म्हणून आपल्या पूर्वजांनी हा दिवस निवडला असावा.” त्यावर त्या बालमनाने पुन्हा प्रश्न केला की,आषाढ महिन्यातच का निवडला? मी तिला म्हणाले की,” आषाढात मेघांची दाटी असते त्याप्रमाणे जीवनात अनेक अडचणी येतात. पावसांच्या सरी कोसळतात तसे संकट कोसळतात. परंतु या सर्वांना डावलून चंद्र जसा हिमतीने पूर्ण प्रकाशमान होतो. त्याप्रमाणे आपले जीवन आपल्या गुरुजनांच्या ज्ञान ज्योतीने प्रकाशमान करून धर्म-अर्थ- काम-क्रोध हे चारी पुरुषार्थ माणसाने मिळवावे ही अपेक्षा लक्षात घेऊनच आपल्या पूर्वजांनी हा महिना निवडला असावा.

तसेच याच दिवशी आपली lसंस्कृती घडविण्याचे कार्य करणाऱ्या आणि आपल्या संस्कृतीचा ज्ञानकोष म्हणजे ‘महाभारत’ हा ग्रंथ लिहिणाऱ्या व्यासमुनींचा जन्मदिवस ही याच आषाढ पौर्णिमेला असतो. म्हणूनच या पौर्णिमेला ‘व्यासपौर्णिमा’ असे म्हटले जाते. तसेच द्वापार युगात एक हजार ऋषींमुनींनी आपले गुरु महर्षी व्यास यांचे पूजन करण्यासाठी हाच दिवस निवडला. या दिवशी व्यासांचेही पूजन केले जाते. अलीकडच्या संगणकीय युगात आपले गुरु, शिक्षक हे संस्कृती घडविण्याचे काम करतात, म्हणून त्यांना मानवी जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेलं नाव म्हणजे ‘गुरुजी’ गुरु हा शिष्याला अर्थ देणारा शब्द त्यांच्यामुळेच विद्यार्थी घडतो. ‘क पासून तर ज्ञ पर्यंत अक्षरे गिरवायला शिकवणारे गुरुजी खरंच धन्य..!’ मानवी जीवनात गुरुचे उच्च स्थान आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक गुरु येत असतात, परंतु प्रथम गुरुचे स्थान असते ते आईला. म्हणूनच म्हटलं जातं
“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”, आईच्या शब्दांनीच मूल बोलायला शिकते त्याचे ते बोबडे बोल, ते ते शब्द आईच्या हृदयात शिरतात आणि प्रेमळ हाक तयार होते ‘आई’ तिच्या नंतर येतात ते आपले गुरुजी. ‘शिक्षणासाठी यावे आणि सेवेसाठी जावे’ हेच आपल्यासाठी आपले गुरुजन सांगत असतात. त्यांची महती सांगायची म्हटलं तर जगातील कोणतीही उपमा त्यांना दिली तरी ती कमीच वाटते इतके ते महान असतात.

सूर्याची उपमा द्यावी तर सूर्य अस्ताला जातो. परिसाची उपमा द्यावी तर तो फक्त लोखंडाचे सोने करतो. समुद्राची उपमा द्यावी तर, तो तहान भागू शकत नाही. कल्पतरूची उपमा द्यावी तर तो फक्त इच्छिलेले फळ देतो. चिंतामणीची उपमा द्यावी तर तो फक्त असणारी चिंता घालवतो. मात्र गुरु या सगळ्यांपेक्षा वेगळा असतो विवेकरुपी तेलाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानज्योतीस चेतना देऊन त्यांचे ज्ञानदीप सचेतन करणे हे शिक्षक, गुरु आपले आद्य कर्तव्य मानतात. शिष्यांच्या बुद्धी बरोबरच मनाला नियंत्रित करणारे ज्ञानही तेच असतात. या ज्ञानाची आपण जेव्हा अहंकाराला बाजूला सारून साधना करतो तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण शिष्य होण्यास पात्र ठरतो.

गुरुविण नाही दुजा आधार
रडता पडता कोठे अडता तोच नेत असे पार
अशा या गुरूंच्या प्रती नाते आपले दृढ व्हावे असे
जसे देवघरातल्या समई आणि ज्योतीचे

आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी सदगुणांचा निर्माता, सत प्रवृत्तीचा पालक,दुर्गुण दुवृतीचा संहारक म्हणजे आपले गुरु यांना शतशः वंदन..!

अनिताअनिल व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे