
शिवजयंतीनिमित्त क्रीडा साहित्य भेट
शिवसाम्राज्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजन
रजत डेकाटे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर/उमरेड: (दि २२) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसाम्राज्य बहुउद्देशीय संस्था, उमरेड यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत उमरेड तालुक्यातील भिवंगड व मुरझडी या गावांतील युवकांना क्रीडा साहित्य भेट देऊन शिवजयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “हर हर महादेव” अशा शिवगर्जनेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आयोजित कार्यक्रमात गावातील युवकांनी पोवाडा गायन व नृत्य सादर करून शिवचरित्राचे दर्शन घडवले, ज्यामुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक व सांस्कृतिक रंगत लाभली.
यामध्ये बॅटमिंटन, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बुद्धिबळ इत्यादी क्रीडा साहित्याचे वितरण जिल्हा युवा पुरस्कारप्राप्त मोनिष महेंद्र अठ्ठरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी युवकांना नियमित खेळाचा सराव करण्याचे, मोबाईल व व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे आणि खेळाच्या माध्यमातून स्वतःचे तसेच आपल्या गावाचे नाव तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. “मैदानात घडलेला युवकच उद्याचा सक्षम नागरिक असतो,” असे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक व क्रीडाप्रेमींनी मनापासून स्वागत केले. अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले गेल्यास ग्रामीण भागातून भविष्यात तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय दर्जेदार खेळाडू घडतील, असा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमास युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या वेळी पोलीस पाटील ललिता मेश्राम, शामराव कुराम, केवड उईके, ईश्वर शेंदरे, सिद्धार्थ मेश्राम, आदेश्वर मसराम, रोशन देवगिरकर, निखिल मेश्राम, निलेश कुराम, सागर उईके, रोहित पुराम आणि आदिवासी क्रीडा मंडळाचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.



