गंमतीदार मासे
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

गंमतीदार मासे
मासे कुणाला आवडत नाहीत आणि ती जर वेगळीच असतील, तर आनंदचा पारावार काही वेगळाच असतो.
माशांच्याही विविध जाती, नाना प्रकार आणि वेगवेगळे आकार पाण्यात राहणारा प्राणी, होडीसारखा आकार अन् सतत हालचाल, शिवाय खाण्याला अतिशय चविष्ट! माशांचे तेलही अत्यंत उपयुक्त असते. त्यापैकी काही गंमतीदार माशाची आपण इथे ओळख करुन घेऊ या.
१) झाडावर चढणारा पर्च मासा:
झाडावर चढून बसणारा हा मासा नऊ ते दहा इंच लांबीचा असतो तो आफ्रिका व दक्षिण आशिया खंडातील गोड्या पाण्यातही सापडतो. या माशाला त्याच्या कल्ल्या शिवायही आणखही श्वसनेंद्रिये निसर्गाने दिली आहेत. त्यामुळे तो हवेतील प्राणवायू वापरून पाण्याबाहेर बराच वेळ जिंवत राहू शकतो. जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा हा मासा एका डबक्यातून दुसर्या डबक्यात आपल्या कल्ल्यांच्या साहायाने चालत जातो. शंभर यार्डात अंतर तो फक्त अर्ध्या तासात पार करतो.
२) दाताचा क्लिनर डाॅक्टर:
हा चार पाच इंचाचा मासा दुसर्या माशांचे दात साफ करून देतो. मोठा मासा छोट्या माशाला खातो हे सत्य आहे; पण गंमत काय होते, बर्याच वेळा या छोट्या माशांच्या अंगावरील काटे, खवले या मोठया माश्याच्या तोंडात अडकतात. मग मोठया माशांना भयंकर वेदना होतात.अगदी असह्य वेदना, मग ते येतात या क्लिनर माशाकडे!मोठा मासा आपले तोंड उघडतो आणि त्याच्या तोंडात मग हा छोटा क्लिनर मासा शिरतो. सगळीकडे फिरतो अन् कुठे काय अडकलंय ते बघतो. त्याचे दात अतिशय तीक्ष्ण असतात. या धारदार दातांनी तो अडकलेले तुकडे काढून त्या मोठ्या माशाची तोंड अगदी साफ करून देतो. कधी कधी गंमतच होते. अशी स्वच्छता करून घ्यायला त्याच्याकडे बरीच गिर्हाईक येतात. पण ते आपसात भांडत किंवा दंगामस्ती करीत नाहीत बरं का! अगदी शिस्तशीर एकामागून एक येऊन आपले काम करून घेतात.आणखी एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा हा क्लिनर मासा,मोठया माशाच्या जबड्यात जाऊन हे साफसफाई चे काम करत असतो तेव्हा तो मोठा मासा मध्येच जबडा मिटून त्याला गडुम करीत नाही बरं का,त्याच्या उपकाराची जाण ठेवतो.या माशाचं परत एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे तो फार चटकन रंग बदलतो.आता फिक्कट लाल रंगाचा दिसणारा मासा एकदम पिवळसर तर लगेच निळा रंग बदलवितो.
३) अपत्य पालन करणारे मासे: अशा प्रकारच्या माशामध्ये सुध्दा मादी मासोळीला दूर ठेवून नर माशे कोणती व कसे अंडीचे रक्षण करतात ते बघू…
अ) सी हार्स: हा मासा जरी माशामध्ये गणला जात असला, तरी आकाराने तो सर्वसाधारण माशांसारखा नसतो. त्याला श्वसनेंद्रिये आणि पाठीचा कणा असतो त्याला कल्लेही असतात. त्यांच्या सहाय्याने तो पाण्यात पोहतो, पण पोहताना मात्र उभा पोहतो. म्हणजे स्वःताची मान सरळ घोड्यासारखी ताठ ठेवतो, या माशाच्या अंगावर खवले असतात. त्याचे डोके अगदी घोड्यासारखे असते. त्याला बाकदार मान, पोट थोडे फुगीर त्यामुळे हा मासा अतिशय डौलदार दिसतो. पाहताना त्याला बघत राहावेसे वाटते. त्याच्या आकारामुळेच त्याला समुद्री घोडा म्हणतात.या माशांच्या बाबतीत आणखी एक गंमतीदार गोष्ट आहे.यातील नरमाशाच्या पोटाला एक पिशवी असते अगदी कांगारूच्या पोटाला असते तशी या पिशवीतच मादी एकावेळी दोनशे ते पाचशे अंडी घालते. ही मादी हुशार असते. अंडी घालून नरमाश्याच्या पिशवीत टाकून देते.आणि नंतर ती अगदी आरामात राहते हिंडते, फिरते बिचारा नर मात्र रात्रदिवस त्या अंड्यांची काळजी घेत असतो. आपल्या पोटाच्या पिशवीत नीट त्यांचा सांभाळ करतो. जेव्हा पिल्ले बाहेर पडतात तेव्हा तो त्यांना पाण्यात सोडतो.
आ) ऑस्ट्रेलियन सी हार्स:
ही ‘सी हार्स’ या माशाचीच एक जात आहे. हा मासा पाच इंच लांबीचा असतो. हा ऑस्ट्रेलियाच्या आसपास असलेल्या समुद्रात सापडतो. या माशाच्या पोटाला स्पंजची पिशवी असते. मादी अंडी घालते आणि नर ती उबवतो.समुद्रातील वनस्पती ज्या भागात असते तिथे हा सापडतो.मोठया माशांपासून संरक्षण करण्यासाठी त्याचे शरीर निसर्गाने मोठ्या गंमतीदार आकाराचे बनविले आहे. त्याच्या अंगाच्या दोन्ही बाजुनी फाद्यांसारखे फाटे फुटलेले असतात.त्यांना पानांसारखे आकार येतात त्यामुळेच तो पाण्यात पोहतो तेव्हा अगदी वनस्पती सारखाच दिसतो. त्याचा आकारच त्याचे संरक्षण करते.
इ) स्वर्गीय मासा:
आपण आपल्याच घरात छोटेसे मत्सालय बघितले आहे. आकर्षक रंगबिरंगी मासे पॅराडाईज फिश म्हणजेच स्वर्गीय मासा हा मासा दिसायला अतिशय सुंदर असतो. अगदी छोट्याशा जागेत त्याची वाढ होत असते.हा इटकुला चार ते पाच इंच लांबीचा मासा शोभिवंत दिसतो.सारखी सळसळ करणारा हा मासा अतिशय चपळ असतो.चीन, कोरिया, फोर्मोसा मध्ये आढळतो.या माशाची मादी एकावेळेस सुमारे दोन हजार अंडी घालते.तिचे अंडी घालण्याचे काम संपले की, नरमासा तिला अंड्यापासून दूर हाकलून देतो.
अजिबात जवळ फिरकू देत नाही.सर्व अंडयाचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतो. स्वतः तोंडातून हवेचे बुडबुडे काढत अंड्याभोवती एक संरक्षक कवच तयार करतो.हे घरटे समुद्रातील वनस्पतीच्या पाण्याखाली सुरक्षित जागी दडवून ठेवतो. त्याभोवती नरमासा अगदी कडक पहारा देत असतो. अंड्यातून पिल्ले बाहेर पडू लागतात. घरटे फोडून पिल्ले बाहेर पडताच चित्र पालटते आतापर्यंत पित्याच्या मायेने अंडयाचे संरक्षण करणारा नरमासा एकदम बदलतो. माया आटते कौर्य जागृत होते आणि आपलेच एकेक पिल्लू तो गटृम करू लागतो अंडी खूप असतात, त्यामुळे पिलांची संख्याही जास्त असते नरशाच्या तावडीतून सुटणारी पिल्ले मोठी होतात.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
========



