0
4
8
2
9
4
चिंब भिजलेले
घामाच्या धारांनी बाबा चिंब भिजलेले
जबाबदारीच्या ओझ्यानं सदा वाकलेले
पाहायचो मी बाबांना कामात मग्न जेव्हा
परिस्थिती बदलण्याचा निश्चय केला तेव्हा
घामाच्या धारांनी बाबा चिंब भिजलेले
गरिबीच्या चटक्यांनी सदैव भाजलेले
आनंदाच्या सरीत न भिजताच गेले सोडून
सल मनाला टोचते स्वप्नं मनीचे गेले मोडून
अश्रूंनी चिंब भिजलेले नयन कोण पुसेल ?
थोडंस दुखू लागता उशाला कोण बसेल ?
प्रेमळ हृदयाचा बाप सर्वांवर करी रे माया
मेघ दाटले नयनी का हरवली रे पितृछाया ?
स्मृतींना हृदयगाभा-यात जपून मी ठेवलंय
कोनाडा उदास झाल्यानं हास्य लुप्त झालंय
काळजावर दगड ठेवून जपतो नात्याची वीण
आठवणींना उजाळा देताना येत नाही रे शीण
आठवणींना उजाळा देताना येत नाही रे शीण
संग्राम कुमठेकर
ता.जि.लातूर
0
4
8
2
9
4



