भिवापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर माजी आमदार सुधीर पारवे
रजत डेकाटे, प्रतिनिधी

भिवापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर माजी आमदार सुधीर पारवे
रजत डेकाटे, प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
भिवापूर : भिवापूर तालुक्यात शेतकरी सततची नापिकी, प्रतिकूल हवामान आणि पीक नुकसानीमुळे आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी भिवापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
या दौऱ्यात पारवे यांनी चिखलापार, महालगाव, सालेभट्टी दंदे, उरकुडापार, पांजरेपार, नांद, वणी आणि धामणगाव (गवळी) या गावांना भेटी दिल्या. यावेळी सोयाबीन, धान, कापूस तसेच अन्य जिरायती व बागायती पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, झालेल्या नुकसानीची माहिती आणि शासनाकडून अपेक्षित मदतीबाबत त्यांनी जाणून घेतले.
पीक नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करण्याच्या प्रक्रियेमुळे नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पीक पेरणी नोंदीच्या आधारे बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी सुधीर पारवे यांनी शासनाकडे केली.
पीक पाहणीदरम्यान पारवे यांनी उमरेडचे उपविभागीय अधिकारी (महसूल) विद्यासागर चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सद्यस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच बाधित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना सुधीर पारवे म्हणाले, “शेतकऱ्याच्या बांधावर उभे राहून त्याची व्यथा समजून घेणे ही केवळ पाहणी नसून, संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करू.”
या दौऱ्यात भिवापूर येथील पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच व उपसरपंच, कार्यकर्ते तसेच संबंधित गावांतील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाधित शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळेपर्यंत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही पारवे यांनी सांगितले.



