रायगड युवा महोत्सवात जे. एस. एम.चा दबदबा
१५ पारितोषिकांसह रायगड दक्षिण विभागास विजेतेपद
रायगड युवा महोत्सवात जे. एस. एम.चा दबदबा
१५ पारितोषिकांसह रायगड दक्षिण विभागास विजेतेपद
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग दि. 18 ऑगस्ट 2025 : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित 58 व्या रायगड (दक्षिण विभाग) युवा महोत्सवात जे. एस. एम. कॉलेजने अभूतपूर्व यश संपादन करत रायगड झोन चॅम्पियनशिप पटकावली. या महोत्सवात महाविद्यालयातील ३३ विद्यार्थ्यांनी २५ स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यापैंकी तब्बल १५ स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली.
युवा महोत्सवाची जिल्हास्तरीय फेरी अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड-जंजिरा, रायगड येथे सोमवार दि. १८ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती.
या महोत्सवात कोलाज, चित्रकला, पोस्टर मेकिंग, वकृत्व (मराठी), कथाकथन (हिंदी), वादविवाद (मराठी), एकांकिका (मराठी), एकपात्री अभिनय (हिंदी) यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा झेंडा उंचावला. कथाकथन (मराठी) तालवाद्यवादन, मूकाभिनय, भारतीय समूहगीत गायन मध्ये द्वितीय तर नाट्यसंगीत मध्ये तृतीय क्रमांक मिळवला. तर वादविवाद (हिंदी/इंग्लिश), लोकनृत्य मध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. कु. श्रेया अधिकारी (टी.वाय.बी.ए.-मराठी) हिने एकूण पाच स्पर्धांमध्ये सहभाग घेत पाच पारितोषिके पटकावून घवघवीत यश संपादन केले.
जनता शिक्षण मंडळाचे मा. अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रवीण गायकवाड, जिल्हा समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे,सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा.श्वेता पाटील यांनी या शानदार कामगिरीबद्दल सर्व विजयी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे व विद्यापीठस्तरीय अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी महाविद्यालयातील प्रा. डाॅ. सिमंतीनी ठाकूर, प्रा. अश्विनी आठवले, प्रा. विनायक साळुंके, प्रा. हर्षला महाजन, प्रा. प्रीतम सातुपे, प्रा. सुरभी वाणी व प्रा. हिमांशू कुलकर्णी यांनी संघ व्यवस्थापक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली.
सांस्कृतिक समितीतील सर्व सहकारी प्राध्यापकांचे सहकार्य व परिश्रम हाही या यशाचा महत्त्वाचा घटक ठरला.



