ही तर माझी नवी सुरवात; शर्मिला देशमुख-घुमरे
ही तर माझी नवी सुरुवात
मनापासून आवडणारी वस्तू
हातातून निसटून पडावी अन्
खळकन् आवाज होऊन तिचा अंत व्हावा
मनाचा आक्रोश मनातच अडखळावा
हुंदका घशातील घशातच विरावा
अगदी तसेच…
प्रिय व्यक्ती सोडून जाते एका वळणावर
आपल्याला खरी गरज असते तेव्हा
वळूनही पाहत नाही आपल्या अवस्थेवर
अनोळखी बनून वागते आपल्या समस्येवर
जग हसत असते फिदीफिदी जेव्हा..
कसं असतं ना….
स्वतः पेक्षाही जास्त विश्वास एखाद्यावर ठेवतो
विश्वास घात जणू दडी मारून बसलेला असतो
एका परमोच्च आनंदाच्या क्षणी तो
हात अलगद काढून घेतो आणि
मागे राहते फक्त उदासवानी आठवण
जीवंत मरण यातनांची साठवण
समजत नाही ना….
काय करावे रागाच्या भरात
सोडून जावे हे जग सारे की…
जगावे पुन्हा नव्या उमेदीने गर्भात घेऊन आशेचे किरण
उजळलेला चेहऱ्यावरील सूर्य दाखवावा समाजात
ओरडून सांगावे मी हारले नाही,मी हारले नाही
ही तर आहे माझी नवी सुरुवात
शर्मिला देशमुख -घुमरे बीड
===========



