Breaking
कविताक्रिडा व मनोरंजननागपूरनाशिकपरीक्षण लेखमहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

आसू आणि हसू’ हे जीवनाचे दोन टोक नसून, एकाच भावनेच्या दोन सावल्या; सविता पाटील ठाकरे

बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 6 2 9 0 4

‘आसू आणि हसू’ हे जीवनाचे दोन टोक नसून, एकाच भावनेच्या दोन सावल्या; सविता पाटील ठाकरे

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

साधारणतः चार-पाच वर्षांपूर्वीचा कुटुंबातला हा प्रसंग आहे. चुलत भावाकडे लग्न होते. हळदीच्या आदल्या रात्री आमच्याकडे पानसुपारीचा कार्यक्रम होता, तोपर्यंत सर्वांशी हसून बोलणाऱ्या माझ्या वयोवृद्ध काकू अचानक मरण पावल्यात. एकीकडे लग्नाचा ओसंडत वाहत चाललेले उत्साहातले हासू आणि दुसरीकडे नवरीचीच आजी अचानक वारल्याने पसरलेले आसू. अतिशय विरोधाभास असलेल्या परिस्थितीतून काकूंची अंत्यविधीही झाली आणि लग्न समारंभही पार पडला. माझ्या मनात विचारांचे हेच द्वंद्व सुरू होते की, माणूस आसू आणि हसू किती सहजपणे सांभाळतो.

हल्ली… तसे पाहता ‘आसू आणि हसू’ या विषयाकडे केवळ सुख-दुःख म्हणून न पाहता, जीवनातील परस्परपूरक भावविश्व म्हणून पाहिल्यास एक सुंदर चिंतनात्मक बाजू तयार होते. आयुष्याच्या वाटेवर चालताना कधी डोळ्यांच्या कडेला आसवांची ओल येते, तर कधी ओठांवर नकळत हसू उमलते. गंमत अशी की, दोन्हींचा जन्म एकाच मनातून होतो. आसू आणि हसू हे जीवनाचे दोन टोक नसून, एकाच भावनेच्या दोन सावल्या आहेत.

हसू दिसतं, आसू लपवावे लागतात. हसताना जग आपल्या सोबत असतं; पण आसू आले की माणूस स्वतःशीच संवाद साधू लागतो. म्हणूनच कदाचित आसू माणसाला अधिक खोल बनवतात आणि हसू त्याला पुन्हा जगण्याची उमेद देतं. कधी कधी एखादं हसू खूप काही लपवत असतं. चेहऱ्यावर हास्य असतं, पण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात दुःखाचा पाऊस कोसळत असतो. काही माणसं तर स्वतःचे आसू पुसून इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यातच आपलं आयुष्य खर्च करतात. त्यांच्या हसण्यातला त्याग समजून घेण्यासाठी डोळे नव्हे, तर मन लागतं.

आसू म्हणजे कमजोरी नाही. ते मनाच्या संवेदनशीलतेचे प्रमाणपत्र असतात. दुःख झालं, अपमान झाला, कुणी आपलं सोडून गेलं, एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं की डोळ्यांत पाणी येतं. त्या पाण्यात केवळ दुःख नसतं, त्यात आठवणी असतात, प्रेम असतं, अपेक्षा असतात आणि कधी कधी न बोललेले हजारो शब्दही असतात. आणि हसू? हसू म्हणजे दुःख नसल्याचा पुरावा नाही तर दुःख असूनही जीवनाला स्वीकारण्याची ताकद आहे, याचा तो पुरावा असतो.

म्हणूनच आयुष्य नेहमी हसतच राहण्याचं नाव नाही. काही क्षण आसवांचे असतात, काही क्षण हास्याचे. दोन्ही अनुभवले की जीवनाची खरी चव समजते. सतत सुख मिळालं तर सुखाची किंमत कळत नाही आणि सतत दुःख मिळालं तर आशेचा अर्थ हरवतो. म्हणूनच निसर्गानेही दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर दिवस दिला आहे. आपल्या आयुष्यातील काही माणसं आपल्याला हसवण्यासाठी येतात, तर काही आपले आसू पुसण्यासाठी. पहिल्यांची आठवण चेहऱ्यावर हसू आणते पण दुसऱ्यांची आठवण डोळ्यांत पाणी आणूनही मनाला आधार देते.

आज ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांच्या संकल्पनेतून ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने या दोघांचा समतोल राखताना खऱ्या अर्थाने कवी कवयित्रींनी भावविश्व सांभाळले. आपापल्या परीने सर्वांनीच सर्व समूहात खूप सुंदर रचना लिहिल्या. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. शेवटी मला एकच सांगावसे वाटते…. “आसू आले म्हणून थांबू नका आणि हसू आलं म्हणून विसरू नका.” ‘आसू मनाला स्वच्छ करतात आणि हसू मनाला पुन्हा उभं करतं.’ कारण, आयुष्याची खरी सुंदरता फक्त हसण्यात नाही; तर आसवांतूनही हसण्याचं कारण शोधण्यात आहे. आसू आणि हसू यांच्यात फारसं अंतर नसतं… कधी हसता हसता डोळे पाणावतात, आणि कधी आसू पुसता पुसता ओठांवर हसू उमलतं. कदाचित म्हणूनच जीवन म्हणत असावं..“मला समजून घ्यायचं असेल, तर माझं हसूही वाचा आणि माझे आसूहीे ओळखा “हाच आजचा संदेश….!!

सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे